(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्लसच्या आगामी मालिकेतून शांभवी सिंह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव “मिस्टर अँड मिसेस परशुराम” असून, यात शांभवी शालिनी या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या प्रोजेक्टबद्दल तिने आपल्या खास भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री शांभवी सिंह म्हणते “खरंच हे सगळं खूप खास आणि उत्साहवर्धक आहे. “मिस्टर अँड मिसेस परशुराम” ही फक्त अॅक्शनची गोष्ट नाही तर भावना, नाती आणि दैनंदिन संघर्ष आधारलेली कहाणी आहे. त्यामुळे ती सर्व पिढ्यांतील लोकांशी जोडली जाणार आहे. हृदयस्पर्शी भावनांना आणि थराराला समतोल साधणाऱ्या या मालिकेचा भाग असणं सर्जनशीलदृष्ट्या खूप समाधान देणारं आहे. लोकांचं मनोरंजन करतानाच त्यांना भावनिकरीत्या जोडणाऱ्या या प्रोजेक्टचा भाग झाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे”
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ती सांगते “शालिनीची भूमिका कणखर आहे पण त्यात सौम्यही आहे. स्थिर आणि आशावादीदेखील आहे. तिचा प्रेम, कुटुंब आणि प्रामाणिकपणावर मनापासून विश्वास आहे. तिची ताकद आक्रमकतेतून येत नाही तर ती येते तिच्या चिकाटीमधून, करुणेमधून आणि भावनिक समजूतदारपणातून. ती अशी स्त्री आहे जी शांतपणे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते आणि तरीही ज्या गोष्टींवर तिचा विश्वास आहे त्यासाठी ठामपणे उभी राहते.”
शालिनी आणि शिवप्रसाद यांच्या नात्याबद्दल ती म्हणते “त्यांचं लग्न विश्वास, साधेपणा आणि खरी सोबत यावर आधारलेलं आहे. ते परिपूर्ण नाहीत; त्यांच्यात मतभेद, भीती आणि कमकुवतपणा आहेत पण त्यांना खास बनवतं ते म्हणजे दररोज एकमेकांना पुन्हा पुन्हा निवडणं. त्यांचं नातं खरंखुरं वाटतं, कारण ते रोजच्या आयुष्यातील नात्यांचं प्रतिबिंब आहे.जिथे समजूत, त्याग आणि सामायिक स्वप्नांमधून प्रेम वाढत जातं.”
या भूमिकेसाठी लागणाऱ्या बहुआयामी अभिनयाबद्दल शांभवी सांगते, “माझ्यासाठी हे खरं तर एक खूपच रंजक आव्हान आहे कारण एक अभिनेत्री म्हणून मला सगळं माहीत असतं, पण शालिनीला ते माहीत नाही. मला सतत तिच्या भावनिक वास्तवात जगावं लागत जे पाहते आणि जे अनुभवते, त्यावरच प्रतिक्रिया द्यायची. शिवप्रसादसोबतचं तिचं निरागसपणं, विश्वास आणि भावनिक सुरक्षितता तिच्या प्रवासाला अधिक स्तरित आणि सुंदर बनवते.”






