बजेटपूर्वी का साजरी केली जाते 'हलवा सेरेमनी'? १० दिवस का 'कैदेत' असतात अधिकारी? (Photo Credit- X)
बजेटला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि त्याची प्रत्यक्ष छपाई किंवा डिजिटल फीडिंग सुरू होण्यापूर्वी दिल्लीतील अर्थमंत्रालयाच्या मुख्यालयात (नॉर्थ ब्लॉक) एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा ढवळून या कार्यक्रमाची सुरुवात करतात आणि मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो स्वहस्ते वाढतात. या कार्यक्रमाला बजेटच्या ‘लॉक-इन’ (Lock-in) प्रक्रियेची सुरुवात मानले जाते.
भारतीय संस्कृतीत कोणत्याही मोठ्या आणि शुभ कामाची सुरुवात ‘गोड’ खाऊन करण्याची परंपरा आहे. याच विचारातून दशकांपूर्वी या सेरेमनीला सुरुवात झाली. ही परंपरा केवळ गोड खाण्यापुरती मर्यादित नसून, रात्रंदिवस बजेट तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे.
हलवा वाटपाचा कार्यक्रम संपला की, बजेट छपाई आणि डेटा एन्ट्रीशी संबंधित १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये असलेल्या प्रेसमध्ये जातात. तिथून पुढचे १० दिवस हे अधिकारी बाहेरील जगासाठी ‘अदृश्य’ होतात. जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्पाचे भाषण पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी आपल्या कुटुंबाला भेटू शकत नाहीत किंवा फोनवर बोलू शकत नाहीत.
Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम
इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे अधिकारी या बेसमेंटवर २४ तास पहारा देतात. तिथे फक्त एक लँडलाईन फोन असतो, ज्यावर केवळ बाहेरून फोन येऊ शकतो, पण आतून बाहेर फोन करता येत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था त्याच बेसमेंटमध्ये केली जाते, जेणेकरून बजेटची कोणतीही माहिती बाहेर फुटणार नाही.
२०२१ पासून भारताचा अर्थसंकल्प ‘पेपरलेस’ झाला आहे. आता बजेटच्या हजारो प्रती छापण्याऐवजी ते डिजिटल स्वरूपात मांडले जाते. मात्र, छपाईचे काम कमी झाले असले तरी डेटा फीडिंग आणि गोपनीयता जपण्यासाठी आजही ‘हलवा सेरेमनी’ आणि ‘नजरकैदेची’ ही परंपरा तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी बजेट सादर होणार असल्याने, यंदाची हलवा सेरेमनी २० ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्यानंतरच अर्थसंकल्पाचे काम करणारे सर्व महत्त्वाचे अधिकारी १० दिवसांसाठी बाहेरील जगापासून पूर्णपणे संपर्क तोडून ‘अंडरग्राउंड’ होतील.






