नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. या कार्यकारिणीत २०२४ लोकसभा निवडणूक भाजपा नव्या अध्यक्षपदाच्या नेतृत्वात लढवणार की जे पी नड्डा यांनाच पुन्हा संधी मिळणार, याकडं देशाचं लक्ष असणार आहे. सध्याच्या स्थितीत जे पी नड्डा यांच्याकडेच पक्षाची आगामी ३ वर्षांसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी राहील असं सांगण्यात येतंय. अद्याप याबाबत पक्षाकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र जर जे पी नड्डा यांच्याकडून ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला देण्यात आली तर तो दुसरा नेता कोण, याची चर्चा सध्या सुरुये.
[read_also content=”न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडिया विमानात धक्कादायक प्रकार, मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाने विमानात महिलेवर केली लघुशंका, एकच गोंधळ…महिलेकडून तक्रार https://www.navarashtra.com/maharashtra/shocking-situation-in-new-york-delhi-air-india-flight-a-drunken-passenger-urinated-on-woman-in-the-plane-one-confusion-359156.html”]
मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता
२०२३ आणि २०२४ ही दोन्ही वर्ष निवडणुंकाची वर्ष आहेत. २०२३ सालात कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह १० महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर २०२४ साली देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळं पक्ष आणि मोदी सरकार या दोन्ही पातळ्यांवर मोठे बदल होण्याची अटकळ बांधण्यात येतेय. भाजपाच्या सध्याच्या काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेच्या कार्यासाठी राज्यांत पाठवले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारीपर्यंत
नड्डा यांनी जुलै २०१९ पासून कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर २० जानेवारी २०२० रोजी त्यांच्याकडं पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात आली. या २० जानेवारी रोजी त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होतोय. त्यामुळं आता त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येतो की नव्या अध्यक्षाची निवड होते, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
अध्यक्षपदाचा नियम काय आहे?
२०१२ साली नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यावेळी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. त्यापूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एक नेता केवळ तीन वर्षच राहू शकत होता. घटनेत केलेल्या बदलानंतर योग्य उमेदवार ३-३ वर्ष असे दोनदा हे पद भूषवू शकतो अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यावेएळी माजी अध्यक्ष व्यकय्या नायडू यांनी हे प्रत्येक अध्यक्षाला लागू होईलच असे नाही, असेही स्पष्ट केले होते.
कोणत्या नव्या नावांची चर्चा?
सध्याचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री भूपेश यादव यांच्याही नावाची चर्चा सध्या अध्यक्षपदासाठी आहे. प्रधान यांची प्रतिमा ही संकटमोचक अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० साली लागू करण्यात आल्यानंतर सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना बदलून प्रधान यांच्याकडं ही जबाबदारी देण्यात आली होती.
तर भूपेंद्र यादव यांच्या नावाचाही विचार अध्यक्षपदासाठी होऊ शकतो. २०१९ सालीही अमित शाहा यांच्यानंतर ते अध्यक्षपदाचे महत्त्वाचे दावेदार मानण्यात येत होते. मात्र त्यावेळी नड्डा यांच्याकडे पक्षानं ही जबाबदारी दिली. यादव हे राजस्थानातील आहेत, यावर्षी राजस्थानात विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळेही त्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त मानण्यात येतेय.