केजरीवालांचं दिल्लीत कुठे चुकलं! योगेंद्र यादव यांनी सांगितलं नेमकं कारण, 'आप'लाही दिला सल्ला
देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे. भाजपच्या त्सुनामीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांसारखे पक्षाचे मोठे चेहरेही पराभूत झाले. दिल्लीत भाजपने ४२ जागा जिंकून स्पष्ट जनादेश मिळवला आहे तर ६ जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. तर आम आदमी पक्षाला फक्त २० जागा मिळाल्या आहेत आणि ते २ जागांवर आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत, एकेकाळी आम आदमी पक्षाचे नेते असलेले योगेंद्र यादव यांनी ‘आप’च्या पराभवाबाबत एक वेगळाच युक्तिवाद केला आहे जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भारत जोडो अभियानाचे संयोजक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी हा आम आदमी पक्षाचा पराभव नसून संपूर्ण विरोधी पक्षाचा पराभव असल्याचं म्हटलं आहे. योगेंद्र यादव म्हणाले, ‘हा पराभव केवळ ‘आप’साठीच नाही तर भारतीय राजकारणात पर्यायी राजकारणाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी धक्का आहे. आम आदमी पक्षाचा १० वर्षांनी पराभव झाला आणि केवळ ५ टक्के मतांचा फरक पडला असं, आपला वाटू शकतं. परंतु जेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या जागा गमावतात तेव्हा तो केवळ एक सामान्य पराभव नसून एक मोठा इशारा असतो. भाजप इथेच थांबणार नाही आणि आम आदमी पक्षाला आणखी तोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
मोफत योजनांच्या आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत
पराभवाची इतर कारणे सांगताना योगेंद्र यादव पुढे म्हणाले, या निवडणुकीतील पराभव हे दर्शवितो की केवळ मोफत योजनांच्या आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत. जर ‘आप’ला ४२-४३% मते मिळाली असतील तर ती या योजनांमुळेच आहेत, परंतु जनतेला केवळ मोफत सुविधाच नकोत तर सुशासन, चांगले रस्ते आणि स्वच्छ दिल्लीही हवी आहे. ते म्हणाले की, आता एमसीडीवरही आपचे नियंत्रण आहे, त्यामुळे दिल्लीच्या स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवरील जनतेच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. जेव्हा सरकार या गरजा पूर्ण करू शकले नाही, तेव्हा जनतेने त्यांना नाकारलं.
…तर ५ वर्षे लोकांमध्ये जावं लागेल
योगेंद्र यादव पुढे म्हणाले की, हा पराभव विरोधी पक्षासाठी एक नवी सुरुवात देखील असू शकते. महाराष्ट्र निवडणुकीपासून इंडिया अलायन्स कमकुवत झालं आहे. या पराभवानंतर, विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे आणि भाजपला तोंड देण्यासाठी स्पष्ट रणनीती आखावी. ते म्हणाले की, निवडणुकीच्या ६ आठवडे आधी तयारी करून भाजपला पराभूत करता येणार नाही. यासाठी विरोधकांना संपूर्ण ५ वर्षे जनतेमध्ये राहावे लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.