कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्यानजीक भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी गाडी ३० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला. रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोल्हापूरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला आणखी एक तरूण जखमी असून, त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये आदित्य प्रतापसिंह घाटगे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) आणि अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. कारमध्ये असलेला देवराज माळी हा जखमी आहे. कोल्हापूरातील हे तिघे जण मित्राच्या लग्नासाठी गेले होते. लग्नकार्य करून परत येत असताना हा भीषण अपघात घडला. यातील जखमी देवराज माळी हा मूळचा जत तालुक्यातील असून, शिक्षणासाठी तो कोल्हापुरात मंगळवार पेठेत राहत होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.