Ileana D'Cruz Told The Reason For Rejecting Ajay Devgn Film Raid 2
अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. २०१८ साली रिलीज झालेल्या ‘रेड’चा हा सिक्वेल असून फार मोठ्या काळानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आल्यानंतर चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अजय देवगणसोबत इलियाना डिक्रुझने स्क्रिन शेअर केली होती. तर दुसऱ्या भागामध्ये, वाणी कपूरने स्क्रिन शेअर केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री इलियाना डिक्रुझने चित्रपटाच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे.
छोट्या मुन्नीची मोठी स्वप्नं, हर्षाली मल्होत्राच्या ‘त्या’ ७ गोष्टी ज्या तिला बनवतात खास
इलियाना डिक्रुझने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ‘रेड २’बद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीने असा खुलासा केला की, तिला ‘रेड २’मध्ये पुन्हा अमेय पटनाईकच्या पत्नीची भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. परंतु, अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली. इलियानाने इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत ‘आस्क मी एनिथिंग’चा सेशन ठेवला होता. या सेशन दरम्यान अभिनेत्रीने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका चाहत्याने तिच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला आहे. शिवाय त्याने अभिनेत्रीची ‘रेड २’सह इतर चित्रपटांमध्ये तिची आठवण काढली आहे.
‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला ‘दादा कोंडके पुरस्कार’ जाहीर, अभिनेत्याने मानले चाहत्यांचे आभार
चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना इलियाना डिक्रुझ म्हणाली की, “मी सुद्धा चित्रपटांमध्ये काम करणं खूप मिस करते, मला खूप आठवण येतेय. मला ‘रेड २’ चा भाग व्हायचं होतं. ‘रेड’ हा माझ्यासाठी एक खास चित्रपट होता आणि त्यात मी मालिनीची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि अभिनेता अजय देवगण यांच्यासोबत काम करणे हा एक खूप खास अनुभव होता. ‘रेड २’च्या निर्मात्यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली होती. पण दुर्दैवाने आम्ही शूटिंगची वेळ निश्चित करू शकलो नाही. कारण त्यावेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता आणि त्यामुळे माझ्यावरच्या जबाबदाऱ्याही पूर्णपणे वाढल्या होत्या. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देत होती. त्यामुळे मला करियरकडे जास्त लक्ष देता आलं नाही. ”
इलियानाने वाणी कपूरच्याही अभिनयाचं कौतुक केलं. कौतुक करताना अभिनेत्री म्हणाली की, “मी चित्रपटाचा प्रोमो पाहिला, त्यातील तिचा अभिनय पाहिला. चित्रपटामध्ये वाणी खूपच सुंदर दिसत होती. मला खात्री आहे की तिने तिच्या व्यक्तिरेखेसाठी जीव ओतून काम केलं असेल. तिने तिच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. ” इलियानाने २०२३ मध्ये मायकल डोलनशी लग्न केले आणि ऑगस्टमध्ये तिने तिच्या मुलाला जन्म दिला. अलीकडेच तिने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली, ज्यामुळे चाहते उत्साहित झाले आहेत.