सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Sangli District Bank Election) ओबीसी गटातून निवडणूक लढवत असणारे मन्सूर खतीब एका संस्थेचे थकबाकीदार असून, एक संस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांची उमेदवारी बेकायदा आहे. ही बाब जिल्हा उपनिबंधक सांगली यांच्या निदर्शनास आणून दिली असून, येत्या चार दिवसांमध्ये याबाबत कायदेशीर तक्रार करणार असल्याची माहिती डफळापूर येथील नेते यशवंत चव्हाण, विजय चव्हाण व रणजीत जाधव यांनी दिली आहे. अशा माणसाला जिल्हा बँकेमध्ये निवडून देणे म्हणजे चुकीच्या माणसाच्या हातात कारभार देण्यासारखे आहे, असा दावाही केला आहे.
डफळापूर येथील या तिघांनी याबाबत पत्रकार बैठक घेऊन खतीब यांनी केलेल्या चुकीच्या कामांचा पाढा पत्रकार बैठकीमध्ये वाचला. चव्हाण यांनी सांगितले की, खतीब यांनी 1991 साली डफळापूर गावातील शेतकर्यांना आर्थिक विकासाचे प्रबळ प्रलोभन दाखवून राजहंस यंत्रमाग विणकर सहकारी संस्था काढली. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. आज तागायत एक मीटरही कापड निर्माण करू शकले नाहीत. वेगवेगळ्या कारणांनी कर्ज मात्र उचलली.
संपूर्ण कारभाराबाबत सभासदांना कायमचा अंधारात ठेवले. जिल्हा बँकेने वसुलीचा तगादा लावून शेवटी सहकार न्यायालयातून बँकेच्या बाजूने निकाल मिळवला. यंत्रमाग इमारत व जागा बँकेने लिलावात विकली. खतीब व त्यांचे सहकारी यांच्यावर अद्यापही 56 लाख रुपये थकीत असल्याचा व संबधित सातबारावर बँकेचा बोजा नोंद असल्याचा दावा करत या सर्वाचा प्रमुख कर्ता-करविता खतीब हेच आहेत, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण म्हणाले, खतीब यांनी 2015 च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही थकबाकीदार असल्याची माहिती लपवून ठेवत निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी हायकोर्टात तक्रार दाखल केली. त्याच दरम्यान खतीब यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, यावेळी पुन्हा फसगत करत माहिती लपवून ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील अनेक नामवंत बँका व पतसंस्था काही चुकीच्या लोकांमुळे अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे अशी चुकीची माणसे जिल्हा बँकेसारख्या सहकार क्षेत्रातील जिल्ह्याची शिखर संस्था असणाऱ्या ठिकाणी संचालक पदावर येणे धोक्याचे आहे.
या अशा लोकांचा या आधीचा कारभार पाहता बँकेत चांगलं काही करतील अशी आशा ठेवणे गैर वाटत आहे. बाजार समितीत असतानाही या व्यक्तीने नातेवाईकांना नोकरी लावली आहे. ही व्यक्ती जिल्हा बँकेत आल्यास पुन्हा वैयक्तिक स्वार्थ साधणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांनी अशा व्यक्तीला संचालक पदापासून दूर ठेवावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.






