राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांची भावनिक सोशल मीडिया पोस्ट केली (फोटो - सोशल मीडिया)
शरद पवार यांना सहा दशकांचा राजकीय अनुभव असून आता तिसऱ्यांदा ते राज्यसभेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये या जागेवर मोठा राजकीय वादंग झाल्यानंतर अखेर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शरद पवार यांचा राजकीय अनुभवाच्या जोरावर सर्वात कमी आमदार असून देखील महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला संधी देण्यात आली आहे. यानंतर आता शरद पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन राजकीय प्रवासाचा आलेख मांडला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
हे देखील वाचा : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले
काय आहे शरद पवारांची पोस्ट?
जेष्ठ नेते शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले.”
१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले. १९६७… — Sharad Pawar (@PawarSpeaks) March 5, 2026
“१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे.”
हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
“महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील,” अशी भावनिक साद शरद पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घातली आहे.






