मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरच्या विधान भवनात (Nagpur Vidhan Bhavan) कोरोनाच्या टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानभवनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजंट (Antigen Test) आणि आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) व्यवस्था करण्यात आली आहे. जा लोकांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करावी असे आवाहन विधानभवनाच्या व्यवस्थापनाने केली आहे.
विधानभवनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागपूर महापालिका (Nagpur Municipal Corporation) आणि आरोग्य खात्याच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक आमदारांना सर्दी, खोकला झाल्याचे आरोग्य तपासणीत पुढे आले आहे.
नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. त्यातच नागपूरसह विदर्भात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अधिवेशनात सर्व आमदार मंत्री थंडीपासून बचाव करणारे कपडे घातलेले दिसतात. अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या तीन दिवसांत निम्म्या आमदारांना सर्दी आणि खोकला झाला आहे.
सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना ताप आला असून काहींना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही समस्या सतावत आहे. विधानभवन परिसरात एकूण ६११ जणांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. नागपुरात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. मुंबईकरांना या थंडीची सवय नसल्यामुळे नागपूर अधिवेशनात काम करताना त्यांना त्रास होत आहे.