अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी (Ram Mandir Inauguration) अवघे काही क्षण उरले आहेत. देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले असून राज्यामध्ये देखील राममय वातावरण झाले आहे. उद्या राज्यामध्ये शासकीय सुट्टी देण्यात आली असून शासकीय इमारती सजवण्याचे आदेश देखील राज्य सरकारने (State Govt) दिले आहेत. मात्र अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र दोघेही या अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे कारण अजित पवार यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याविषयी मत मांडले. अजित पवार म्हणाले, देशातल्या इतर काही राज्यांनी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपल्या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शासकीय इमारतींमध्ये रोषणाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे रामभक्त त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम करणार आहेत. अनेक कार्यालयांमध्ये कार्यक्रमांची तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुढे अजित पवार यांना अयोध्येमध्ये मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का नाही असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. खरंतर, मी आणि मुख्यमंत्री आजच या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार होतो. परंतु, काल मी उरूळी कांचनला असताना मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. ते मला म्हणाले, ‘आपल्याला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आहे. मात्र उद्या या कार्यक्रमाला केवळ आपण दोघेच न जाता काही दिवसांनी आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाऊया. आपण एक तारीख ठरवू आणि त्या दिवशी अयोध्या दौरा करू. आपण दोघेच तिथे जाणं आणि बाकीच्यांना उद्या तिथे जाता न येणं योग्य नाही. त्यामुळे आपण नंतर सर्वांना घेऊनच जाऊया.’ कारण उद्या इतरांना तिथे जाण्याची परवानगी नाही. राज्याच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही उद्या अयोध्येला जाणार नाही. असे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अयोध्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे दिले.