तळेगाव दशासर : अपघात झाल्याची बतावणी करून टँकररमधील खाद्य तेलाचा अपहार केल्याची घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घुईखेड गावातील नदीच्या पुलाजवळ उघडकीस आली. या प्रकरणात तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माहितीनुसार, तक्रारदार शेख जाहिद हुसेन वल्द हबीब शेख हे चंद्रपूरच्या रामदेव बाबा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेड ब्रह्मपुरीमध्ये पर्सनल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. 9 डिसेंबर रोजी जळगाव येथून 50 मेट्रिक टन तेलाच्या मागणीनुसार रोहित ट्रान्सपोर्ट कंपनीने मुंबईहून टँकरची मागणी केली, त्यावर कंपनीने टँकर (क्रमांक एमएच 12/क्यूडब्ल्यू 0875 व 8621) पाठविला. दोन्ही टँकरमध्ये तेल बिलासह 23,25,720 रुपये किमतीचे 25.960 मेट्रिक टन तेल भरून जळगावला पाठविण्यात आले. परंतु, 8 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता तक्रारदार व्यवस्थापक शेख जाहिद हुसेन यांना राधेश्याम यादव यांचा फोन आला की, एमएच 12/क्यूडब्ल्यू 0875 क्रमांकाचा टँकर नागपूर-औरंगाबाद रस्त्यावरील घुईखेड नदीच्या पुलावर उलटला असून, त्यात भरलेले तेल खाली पडले आहे.
तसेच, टँकरचालक नसल्याचेही सांगण्यात आले. या माहितीवरून ट्रान्सपोर्ट मालकाचा त्यांच्या कंपनीतील मुश्ताक खान याला तातडीने नागपूर-औरंगाबाद रोडवरील घुईखेड येथे घटनास्थळी पाठविले.






