राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस (Vidarbha Rain) पडत आहे. नागपूरपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्हयात संततधार कोसळत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. गडचिरोलीमध्ये पावसामुळे काही तालुक्यांचा संपर्क तुटला असून भामरागडमधील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, चंद्रपुरात सर्वाधिक २६० मिमी पावसाची नोंद झाली असून, पुरस्थिती बघता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
[read_also content=”भयंकर जळीतकांड ! 6 महिन्यांच्या निष्पाप बाळासह चार जणांना जिवंत जाळलं, सामूहिक हत्याकांड घडवलं नंतर लावली आग https://www.navarashtra.com/crime/four-people-of-same-family-burnt-alive-along-with-a-6-month-old-innocent-child-in-jodhpur-nrps-433628.html”]
गेल्या दोन-तीन दिवसापासून विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. पावासाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला बसला असून गडचिरोतील भामरागड येथील रस्त्यांसह मुख्य महामार्ग पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ४० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. तर, मंगळवारी चंद्रपुरात सर्वाधिक २६० मिमी पावसाची नाेंद झाली असून, संपूर्ण जलमय झालेल्या शहरातील शेकडाे घरे पाण्याखाली गेल्याची स्थिती हाेती. जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे काही शेतांत पाणी साचले आहे. ही संभाव्य पूरस्थिती बघता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांत हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेता. वर्ध्यात दिवसा ३१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूरला १२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाचा जाेर वाढला हाेता. दरम्यान, काही दिवसांच्या पावसाने पूर्व विदर्भातील बॅकलाॅग भरून काढला आहे. भंडारा, गाेंदिया व आता गडचिराेली, चंद्रपुरात पाऊस सरप्लस झाला असून, नागपूर व वर्ध्यात असलेली तूट सामान्य आहे. अकाेला, अमरावतीत मात्र तूट २५ टक्क्यांवर आहे. विदर्भात पुढचे दाेन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी अतितीव्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या तीन दिवसापासून भंडारा जिल्ह्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला नसून गोसेखुर्द धरणातून सातत्याने टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला असून गेल्या २४ तासांत २२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे ५ दरवाजे रात्री उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.