मार्च १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनी पुरती हादरून गेली होती. या बॉम्बस्फोटांचे सूत्रधार टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम हे आजवर आपल्या हाती लागलेले नाहीत, कारण त्यांनी पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. या बॉम्बस्फोटानंतर पुढच्या काळात देशभर ठिकठिकाणी असे दहशतवादी हल्ले होत राहिले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार सुद्धा आपल्या हाती आलेच नाहीत. ते पाकिस्तानात आरामात राहत आहेत. ऐंशीच्या दशकापासून धुमसणारा पंजाब, त्याआधीपासून दहशतवादात होरपळणारी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू काश्मीर हे भारताच्या सुरक्षिततेला आणि प्रगतीला सातत्याने धोका बनून राहिले आहेत. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश ही भारतात थैमान घडणाऱ्या दहशतवाद्यांची मुख्य आश्रयस्थानं. भारतातील माफिया टोळ्या आणि गुन्हेगार देखील या देशांमधून आश्रय घेतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि चीन या महासत्तांकडून भारत विरोधी दहशतवादी संघटना, गुन्हेगारी टोळ्या यांना पैसा आणि शस्त्रांचा पुरवठा होत असतो. भारतामध्ये कायम अस्थिर वातावरण ठेवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जातो. दहशतवादी संघटनांचे सूत्रधार पकडले न जाणं आणि त्यांना श्रीमंत देशांचा छुपा पाठिंबा असणं यामुळे दहशती कारवायांवर नियंत्रण मिळवणं ही भारतासाठी फार मोठी डोकेदुखी होऊन बनली आहे.
मुस्लिम देशांनी वेढलेल्या आणि पॅलेस्टाईन दहशतवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या इस्रायलपुढेदेखील भारतासारख्या समस्या पहिल्यापासून आहेत. या दहशतवादाविरुद्ध लढताना मोसाद ही गुप्तहेर संघटना महत्त्वाची भूमिका पार पाडते. दहशतवादाविरुद्ध अत्यंत कणखर भूमिका घेण्याची या देशाची नीती राहिली आहे. भले मग त्यासाठी कितीही मोठी जोखीम घ्यावी लागली तरी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युनिच ऑलिम्पिक वेळी इस्रायली खेळाडूंची पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेली हत्या आणि त्याचा इस्रायलने उगवलेला सूड… जर्मनीच्या म्युनिच शहरात ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केलेलं होतं. विविध देशांच्या खेळाडूंची राहण्याची सोय ज्या उपनगरात केली गेली होती तिथे ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचे लोक घुसले. त्यांनी काही इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवलं आणि त्या बदल्यात त्यांच्या इतर साथीदारांच्या सुटकेची मागणी केली होती. पुढे घटनाक्रम असे घडत गेले की सर्व इस्रायली खेळाडू आणि त्यांना पकडणारे पॅलेस्टिनी दहशतवादी पोलीस कारवाईत ठार झाले. परंतु इस्रायलने या हत्याकांडाचा सूड घ्यायचा निर्णय घेतला. या घटनेचे सूत्रधार आणि ब्लॅक सप्टेंबर गटाचे मुख्य नेते यांची खडानखडा माहिती गोळा करायला मोसादने सुरुवात केली. पुढे अगदी योजनाबद्ध रीतीने यातील अनेकांचा खात्मा मोसादने केला. मोसादच्या या ऑपरेशनच नाव होतं ‘व्रथ (wrath) ऑफ गॉड’. पॅलेस्टिनी अतिरेकी युरोप आणि अरेबिक देशांमधून वावरत होते. मोसादने त्या त्या देशांमध्ये जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. दुसऱ्या देशाच्या भूमीवर अशा प्रकारचे कृत्य करणे हे अत्यंत धाडसाचे आणि जोखमीचे काम आहे पण अशी जोखीम उचलण्याचा प्रगल्भपणा आणि कणखरपणा इस्रायली सरकारने त्यावेळी दाखविला. किंबहुना त्यापुढेही सातत्याने इस्रायलची भूमिका तशीच राहिली. इस्रायलच्या मोसाद प्रमाणे भारताच्या रॉ या संघटनेने अशा प्रकारच्या कारवाया केल्याचं फारसं कधी ऐकिवात नाही पण सध्या पाकिस्तान, कॅनडा या देशातील घटनाक्रम पाहता काहीतरी वेगळं घडतंय अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे.
काय घडतय पाकिस्तानात?
कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यात भारताचा सहभाग असल्याचं विधान तेथील संसदेत केलं. भारत सरकारने याचा तीव्र शब्दात इन्कार केला. निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकार गुंतले नसावेही पण पाकिस्तानात गेल्या दीड वर्षात घडत असलेल्या घटना मात्र बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. दिनांक १ मार्च २०२२ रोजी जहूर मिस्त्री या जैश ए मोहम्मद या काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करण्यात गुंतलेल्या संघटनेशी संबंधित अतिरेक्याचा पाकिस्तानातील कराची शहरात गोळ्या घालून खून करण्यात आला. गोळ्या घालणाऱ्या लोकांचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागला नाही. हा जहूर मिस्त्री १९९९ मध्ये भारतीय विमानाचे अपहरण करून अफगाणिस्तानातील कंधारला नेण्याच्या कटात सहभागी झाला होता. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतील संपविलेला हा पहिला दहशतवादी. आणखी चार महिन्यांनी जुलैमध्ये रिपूदमन सिंग मलिक हा खलिस्तानी अतिरेकी कॅनडामध्ये मारला गेला. हा देखील विमान अपहरणात सामील होता.
यानंतर भारत विरोधी खलिस्तानी आणि काश्मिरी अतिरेकी मारले जाण्याची एक मालिकाच जणू सुरू झाली. गेल्या दीड वर्षात असे साधारण पंचवीस पेक्षा जास्त अतिरेकी यमसदनास पाठविले गेले आहेत. २०१८ मध्ये जम्मूतील संजीवन येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात गुंतलेला ख्वाजा शाहिद, २०१६ मधील पाम्पोर येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामागचा अदनान अहमद, याच वर्षी पठाणकोट लष्करी हवाई तळावर हल्ला करणारा दहशतवादी शाहिद लतीफ, राजौरी हल्ल्यातील अबु कासिम असे नामचीन दहशतवादी पाकिस्तानात मारले गेले आहेत. लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन, अल बद्र, खलिस्तानी कमांडो फोर्स अशा वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना टिपलं जात आहे.
हाफिज सईद, झाकी उर रहमान लखवी यासारख्या बड्या दहशतवाद्यांच्या जवळचा आणि २००८ मधील मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार साजिद मीर पाकिस्तानच्या तुरुंगात होता. कित्येकदा अशा लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशा तुरुंगात ठेवण्याची पाकिस्तानात प्रथा आहे. अशा सुरक्षित तुरुंगातील साजिद मीरला अन्नातून विषबाधा झाली किंवा करविली गेली. साजिदची तब्येत बिघडल्यावर हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याला लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले पण तो वाचला नाही. जिथे बंदुकीची गोळी चालवता येणार नव्हती तिथे विषयाच्या गोळीने काम केले. २०१९ सालच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सामील असलेला मोहीउद्दीन औरंगजेब सध्या गायब आहे. त्याचं अपहरण केलं गेलं असावं असा संशय आहे. कदाचित काही दिवसांनी तो मृत अवस्थेतच एखाद्या ठिकाणी सापडेल. या सगळ्या प्रकारामुळे दहशतवादीच आता दहशतीखाली वावरत आहेत असं बोललं जातं. अलीकडेच पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी लष्करी मुख्यालयात काही मुल्ला मौलवींची सभा बोलाविली होती. त्यावेळी असीम मुनीर स्वतः बुलेटप्रूफ काचेच्या मागे बसले होते असं म्हणतात. पाकच्या लष्कर प्रमुखाला त्यांच्याच मुख्यालयात सुरक्षित वाटू नये अशी दहशत पसरली आहे. या सगळ्या मागे भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’ आहे का? मोसादप्रमाणे ‘रॉ’ने देखील चालवलेलं हे ऑपरेशन व्रथ (wrath) ऑफ गॉड तर नव्हे?
या घटनांमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान करतोय खरा पण खुद्द पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय यामागे असावी असाही संशय व्यक्त केला जातो आहे. अनेक दहशतवाद्यांना पाळणं पाकिस्तानला देखील जड जात आहे. त्यामुळे त्यांचा परस्पर काटा काढून भारताकडे बोट दाखवायची पाकची चाल असू शकते. फायनान्शियल टाइम्स, गार्डियन ही वर्तमानपत्रे, परसेप्शनसारखी वेबसाईट अशी आंतरराष्ट्रीय माध्यमे मात्र पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून भारतावर आरोप करताना दिसत आहेत. अर्थात या माध्यमांचे बोलविते धनी अमेरिका, इंग्लंड, चीन यासारखे देशच आहेत. या देशांनी आजवर वाढवून मोठे केलेले भारताचे शत्रू असे कमी होत जात असलेले त्यांच्या पचनी पडणारं नाही. असो, या निमित्ताने जागतिक पटलावर ‘रॉ’ची नवी ओळख समोर येते आहे.
– सचिन करमरकर