फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Hemant Dhome New Movie : ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘चोरीचा मामला’, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन अभिनेता हेमंत ढोमे याने केलं आहे. हेमंत ढोमे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली आहे. उत्तम विषय आणि दमदार कथानक हाताळत हेमंत ढोमे नवा चित्रपट साकारत असतो. आता अशातच अभिनेता लवकरच ‘झिम्मा २’नंतर नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. यासंदर्भात हेमंत ढोमेने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
हे देखील वाचा – रांगडं व्यक्तिमत्व अन् नजरेत दरारा, ‘येक नंबर’ चित्रपटाचा धडाकेबाज पोस्टर रिलीज
अभिनेता हेमंत ढोमेने फेटा घातलेला फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “उद्या होणार फसक्लास… हा फोटो आहे मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा…त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर…बोलता बोलता माझी भाषा तिथली होते आणि पण लगेच तिथला होतो…प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो… पण मला जरा जास्तच आहे.”
“मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परीसर खूप सुंदर आहे! लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी आणि क्षितीची म्हणजे आपल्या चलचित्र मंडळीची चौथी निर्मिती असताना मी आणि क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा… आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा! गंमत बघा माझ्या लाडक्या टिमसोबत आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शुट करता आला! लय भारी वाटलं राव!!!”
हे देखील वाचा – ऑन-स्क्रीन शिक्षकांची झलक दाखवणाऱ्या ‘या’ पाच कलाकारांवर टाका नजर!
“आता तो पुर्ण झालाय आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय… कधी, कसा ते सगळं उद्या सांगतोच! पण माझ्या अत्यंत जवळचा विषय… मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधून सुद्धा मांडत राहिनच! तर मंडळी माझ्या मातीचा अभिमान आता तुम्हा सगळ्यांना हक्काने सांगायचाय… कोणीतरी म्हणलेलच आहे, “सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो” तर आता वेळ आलीय हे तपासून बघण्याची… तुमच्यासमोर हक्काने पुन्हा एकदा थोडसं चाचपडायची… तर उद्या सग्गळं “फसक्लास” होणार! #पाटलांचा_नवासिनेमा ”






