सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने एक महिन्याच्या तान्ह्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आहेत, ज्याला बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन होते. ही एक दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे, जिचा नवजात बाळांच्या श्वासोच्छवासावर आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. या तान्ह्या बाळावरील यशस्वी शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी नवजात बाळाची काळजी घेण्यामधील उल्लेखनीय कामगिरी आहे.
कबीर मन्सुरी या तान्ह्या बाळाला फक्त सात दिवसांचे असताना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि रक्तात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे सतत श्वास घेताना त्रास होत होता. २ डी इकोकार्डियोग्राफीसह प्राथमिक तपासणीत फुफ्फुसामध्ये उच्च रक्तदाब दिसून आला. पण, डॉक्टरांना डायफ्राममध्ये अतिरिक्त अंतर्निहित समस्या असल्याचा संशय आला. त्यानंतर सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुस निकामी होण्यासह न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले, तसेच पुढील चाचण्यांमध्ये डायफ्रामची अयोग्य हालचाल होत असल्याचे निदर्शनास आले, ज्यामधून जन्मजात दोष असल्याचे दिसून आले.
नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात बाळाची प्रकृती स्थिर केल्यानंतर मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. रसिकलाल शाह यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ पीडियाट्रिक सर्जिकल टीमने डायफ्रामच्या दोन्ही बाजूंनी कमीत-कमी प्रवेश किंवा की होल थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया करून इव्हेंट्रेशनवर उपचार केले. डॉ. रसिकलाल शाह यांनी माहिती दिली की, डायफ्रामच्या दोन्ही बाजू दुरुस्त करण्यासाठी बाळाच्या छातीत एक अतिशय पातळ कॅमेरा आणि दोन उपकरणे घालून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन्ही डायफ्राम खूप पातळ व कमकुवत होते आणि प्लिकेट करण्यासाठी अतिशय सौम्य व काळजीपूर्वक हाताळणीची आवश्यकता होती. प्लिकेटेशन डायफ्रामला खालील बाजूस ढकलते आणि फुफ्फुसांना विस्तारण्यासाठी अधिक जागा मिळते, ज्यामुळे वायूंची देवाणघेवाण होऊन कार्बन डायऑक्साइड पातळी कमी होते. की होल सर्जरीमुळे बाळाची रिकव्हरी जलद झाली. याव्यतिरिक्त, या सर्जरीमुळे अनेक दीर्घकालीन समस्यांना प्रतिबंध होतो आणि मुलाला डायफ्रामॅटिक हर्निया असो किंवा इव्हेंट्रेशन असो, डायफ्राम दुरुस्त करण्याचा हा पसंतीचा पर्याय आहे.
बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन ही अत्यंत दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे, ज्यामध्ये डायफ्रामच्या दोन्ही बाजू असामान्यपणे वाढतात आणि त्यांची हालचाल मर्यादित असते, ज्यामुळे नवजात बाळांना श्वसनाचा तीव्र त्रास होतो. त्वरित उपचार केले नाहीत तर श्वसनक्रिया बंद पडू शकते.
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या क्रिटीकल केअर मेडिसनीच्या कन्सल्टण्ट डॉ. मंजू कुमारी या प्रक्रियेबाबत सविस्तरपणे सांगत म्हणाल्या, ”ही आव्हानात्मक केस होती, कारण संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बाळाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला फुफ्फुसांचे योग्य व्हेंटिलेशन राखावे लागले. डायफ्रामच्या अत्यंत दुर्मिळ जन्मजात दोषामुळे फुफ्फुसांना सौम्य आधार देण्यासाठी बाळाची उच्च वारंवारतेच्या व्हेंटिलेशनसह देखभाल घ्यावी लागली, त्याच वेळी शरीरात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी सुरक्षित मर्यादेत राखण्यात आली. बाळावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आणि कोणत्याही गुंतागूंतीशिवाय डिस्चार्ज देण्यात आला.”
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. झुबिन परेरा म्हणाले, ”या केसमधून आमच्या तज्ञ बहुआयामी टीम्सची क्षमता आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली प्रगत नवजात शिशु केअर दिसून येते. बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशन अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे आणि नवजात बाळांसाठी जीवनाला धोकादायक आव्हान आहे. या तान्ह्या आणि गंभीर आजारी रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी आमच्या क्रिटिकल केअर, शस्त्रक्रिया आणि नवजात शिशु टीम्समध्ये विनासायास समन्वय आवश्यक होता.”
कबीरच्या केसमधून बहुआयामी दृष्टिकोन, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि विशेषीकृत केअरच्या माध्यमातून तान्ह्या बाळांमधील व लहान मुलांमधील गुंतागूंतीच्या स्थितींची हाताळणी करण्यामध्ये नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे कौशल्य दिसून येते. तसेच यामधून जागतिक दर्जाचे उपचार देण्याप्रती आणि गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवीन जीवनदान देण्याप्रती हॉस्पिटलची सातत्यपूर्ण कटिबद्धता देखील दिसून येते.