नागपूर : जिल्ह्यातील चार जणांचा डेंग्यूने मृत्यू (Death Due to Dengue) झाल्याचा संशय होता. पण त्यातील एकाही मृत्यूला डेंग्यू कारणीभूत नाही अशा आशयाचे शपथपत्र बुधवारी महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. या संशयित मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नागपूर विभागाच्या आरोग्य विभाग उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली 17 डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून 23 ऑगस्ट रोजी आपला अहवाल सादर केला. या समितीने दिलेल्या अहवालानुसार डेंग्यूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असेही मनपाने न्यायालयाला सांगितले.
खामल्यातील संचयनी कॉम्प्लेक्समधील कचरा आणि सांडपाण्यामुळे परिसरात डेंग्यूची साथ पसरल्याचा दावा करणारी जनहित याचिका खामला येथील पूनम प्राईड निवासी सदनिकेतील नागरिकांनी दाखल केली. ती उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या सुनावणी दरम्यान अॅड. तेजल आग्रे यांनी या प्रकरणी एक अर्ज दाखल केला. त्यानुसार, शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला असून, त्याच्या नियंत्रणासाठीच्या मनपाच्या उपाययोजना पर्याप्त नाहीत, असा दावा केला होता. त्यावर बुधवारी न्या. अतुल चांदूरकर व न्या. वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
यावेळी मनपातर्फे ऍड. सुधीर पुराणिक यांनी शपथपत्र दाखल केले. यात 24 ऑगस्ट रोजी डेंग्यू नियंत्रण समितीच्या बैठकीतील माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार, शहरात सध्या 2025 डेंग्यूसदृष्य रुग्ण आहेत. मात्र, केवळ 262 रुग्णांना डेंग्यू असल्याचे समोर आले आहे.
डेंग्यूने मृत्यू झाल्याचा दावा
सुनावणीदरम्यान ऍड. तेजल आग्रे यांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करत जिल्ह्यात डेंग्यूने काही मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. यासाठी आधार म्हणून त्यांनी वृत्तपत्रांचे कात्रणही न्यायालयात सादर केले आहे.