कल्याण : येत्या काही तासांमध्ये अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळा(Ram Mandir Inauguration) पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरामध्ये भक्तीमय वातावरण असून सर्वत्र रामनामाचा जयघोष सुरु आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांच्या पुढाकाराने भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेचे (ShivSena YuvaSena) सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्यामध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार असल्यामुळे देशभरामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील भाजप शिवसेनेतर्फे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवली राममय झाली असून राम भक्तांमध्ये विलक्षण उत्साह पहायला मिळतो आहे. शिवसेना युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे आज डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
बाईकवर श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे बॅनर्स लावत व भगवे झेंडे हाती घेत तरुणांनी जल्लोषात ही बाईक रॅली केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जय श्रीरामाच्या जयघोष करण्यात आला. घोषणेमुळे अवघे डोंबिवली शहर रामनामात दुमदूमले होते.
खा. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये राम मंदिरची भव्य प्रतिकृती
कल्याण पूर्वेमधील चक्कीनाका परिसरातील मैदानात आयोध्येतील राममंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराचे काल संध्याकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी वृषाली शिंदे यांनी सांगितले की, “सगळ्यांना अयोध्येला जाऊन दर्शन घेता येणार नाही. त्यासाठी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिराची ही प्रतिकृती उभारली आहे. सगळेकडे जल्लोषाचे वातावरण आहे. २२ जानेवारीचा सोहळा हा दिवाळी सारखा साजरा केला जाईल.” असे मत वृषाली शिंदे यांनी व्यक्त केले.