मुंबई : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, मुंबई अध्यक्ष व राज्य सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पातळी सोडून भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मलिक यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी खालच्या स्तरावर जावून टीका केली आहे, त्याची योग्य ती दखल घेण्याची विनंती लाड यांनी शरद पवार यांना केली आहे.
कालच शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात लाड यांनी म्हटले आहे की, “अत्यंत दुःखी अंतःकरणाने हे पत्र लिहित आहे. मलिक यांनी पातळी सोडून अत्यंत खालच्या भाषेत देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांना माशा मारण्याशिवाय दुसरे काम नाही…,” असे शब्द त्यांनी महाराष्ट्राच्या एका प्रमाणिक नेत्याबद्दल आणि माजी मुख्यमंत्र्याबद्दल वापरले आहेत. हे अत्यंत निषेधार्ह आहे.”
लाड यांनी पुढे नम्रपणे असेही नमूद केले आहे की, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसून अशा प्रकारची टीका सुरू राहिली तर भाजपच्या नेत्यांनाही ‘आरेला कारे’ करावे लागेल व जशास तसे उत्तर द्यावे लागेल. “हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. म्हणून साहेब, आपण आपल्या या नेत्याच्या खालच्या स्तरावरील भाषेची दखल घेवून योग्य ती समज द्याल ही माझी अपेक्षा आणि खात्री आहे,” असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
[read_also content=”क्रूड तेलाच्या किमती ७० डॉलरपर्यंत जाणार : एंजल ब्रोकिंगचा निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/angel-broking-concludes-that-crude-oil-prices-will-reach-70-dollers-nrvb-130631.html”]
“साहेब, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आपल्या तालमीत आणि राजकीय संस्कारात वाढले आहेत. तसेच संस्कार माननीय देवेंद्रजींनी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिले आहेत आणि तेच संस्कार घेवून आम्ही आमची राजकीय वाटचाल करत आहोत. आपण आपला स्तर आणि दर्जा राजकारणात घसरू द्यायचा नाही, कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, हे तुम्ही दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिकवत आला आहात. त्यातून राजकारणाचीही पातळी राखली जाते. मात्र राष्ट्रवादीच्या या नेत्यांनीव मंत्र्यांनी टीका करताना ही पातळी सोडली आहे,” असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
Prasad Lad wrote a letter to NCP President Sharad Pawar and demanded to take note of Nawab Maliks statement