नवी दिल्ली : पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला संघाचा पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. संघाने त्याला १२ कोटींमध्ये कायम ठेवले. २०१८ पासून तो या संघाचा एक भाग आहे. गेल्या मोसमात केएल राहुल कर्णधार असताना मयंकने काही सामन्यांमध्ये त्याच्या अनुपस्थितीत पंजाबचे नेतृत्वही केले होते. पंजाबने एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही.
२०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंकने या स्पर्धेतील १०० सामन्यांमध्ये २३.४६ च्या सरासरीने २१३५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९५ डावांमध्ये १ शतक आणि ११ अर्धशतकं आहेत.
मयंकपूर्वी केएल राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता. मेगा लिलावापूर्वी राहुलने संघापासून दुरावण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लखनऊच्या टीमने त्याला १७ कोटी रुपयांच्या ड्राफ्टमध्ये सामील करून घेतले.