फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असून, हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च ठरला आहे. प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्के झाली असून, वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाची अंतिम मुदत १४ ऑगस्टवरून ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी घेतलेल्या विशेष उपाययोजनांमुळे पॉलिटेक्निक प्रवेशात मागील दहा वर्षांतील विक्रम झाला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्ट हा अंतिम दिनांक ठरविण्यात आला होता; मात्र दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत थेट संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेऊ शकतील.
हीच अंतिम तारीख थेट द्वितीय वर्ष प्रवेश तसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी देखील लागू असेल. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार, आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. उद्योगसंबंधित कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावसायिक यशासाठीही सज्ज करतात, असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले. या विक्रमी प्रवेशामुळे राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात नवा उत्साह आणि उर्जा निर्माण झाली असून, तंत्रशिक्षण विभाग यापुढेही उद्योग-शिक्षण एकत्रीकरणावर भर देणार आहे.