छत्रपती संभाजीनगर- नामांतरावरुन शहरात गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम अखेरीस पाहायला मिळाला. रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपूर परिसरात दोन गटांत मोठी वाद झाला. रामनवमीच्या तयारीसाठी युवक एकत्र जमा झालेले होते. या वादातून काही वेळात दंगल पेटल्याची माहिती देण्यात येते आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र अनियंत्रित झालेल्या जमावानं पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करुन काही गाड्या जाळल्याचीही माहिती आहे. या दगडफेकीत दोन पोलिसांसह 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा सुरु झालेला हा प्रकार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरु होता.
Maharashtra | A clash broke out between two groups in Chhatrapati Sambhajinagar’s Kiradpura area
Stones were pelted, some private & police vehicles were set on fire. Police used force to disperse the people and now the situation is peaceful. Police will take strict action… pic.twitter.com/u9qa5XYyPk
— ANI (@ANI) March 30, 2023
रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काही जण या गोंधळात मंदिरात गेले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या काळात वाढीव बंदोबस्त मागवला मात्र तोपर्यंत दंगल पेटली होती. मंदिरासमोर उभं असलेली पोलिसांची गाडी जमावानं पेटवली.. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस दाखल झाले, तरीही जमाव ऐकण्य़ाच्या स्थितीत नव्हता. या पोलिसांवरच जमावानं दगडफेक केली. अखेर पोलिासंनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर जमाव पांगण्यास सुरुवात झाली.
जमाव ऐकत नसल्यानं आणि पोलिसांवरच हल्ला होत असल्यानं जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती आहे. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत रात्री हा गोंधळ सुरु होता. घरांवर दगडफेक करण्यात आल्याचीही माहिती आहे. पहाटे 4 पर्यंत या जमावार नियंत्रण आणण्याचं काम सुरु होतं.
दंगलीचं वृत्त ऐकल्यानंतर राजकीय नेत्यांचीही धावपळ उडाली. अनेक नेते घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. खासदार इम्तियाज जलील हेही या घटनेनंतर किराडपुऱ्यात पोहचले. त्यांनी आणि पोलिसांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं. आज दिवसभरात याचे पडसाद उमटू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.