महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदणेला मोठा धक्का; न्यायालयाचा मोठा निर्णय
Satara Doctor Death Case: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी PSI गोपाल बदणे यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे बदणे यांना मोठा धक्का बसला आहे. आरोपी PSI गोपाल बदणेने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला काल फलटण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये बदणेने तिच्यावर चार वेळा शारीरिक शोषण केल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
काल सातारा जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी, सरकारी वकील अॅड. सुचित्ता वायकर-बाबर यांनी बाजू मांडली. “मरण पावलेली महिला कधी खोटं बोलत नाही. आरोपीवर गंभीर आरोप आहेत. त्याचा मोबाईल, वाहन आणि वैद्यकीय तपास करणे गरजेचे आहे, तसेच घटनास्थळाची तपासणीही आवश्यक आहे. त्यासाठी आरोपी बदणे याला 7 दिवसांच्या पोलिस कोठडी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.
तर अॅड. राहुल धायगुडे यांनी आरोपी गोपाल बदणे याची बाजू मांडली. “माझा क्लायंट निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे फक्त 1 दिवसाची कोठडी पुरेशी आहे.” असे धायगुडे यांनी सांगितले. तदोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सह-दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांनी PSI गोपाल बदणेला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. त्या डॉक्टर प्रशांत बनकर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता आणि प्रशांतने डॉक्टरांना घर रिकामं करण्यास सांगितलं होतं.
घर सोडल्यानंतर डॉक्टर हॉटेलमध्ये राहू लागल्या आणि काही दिवसांनी त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर — या दोघांची नावं नमूद केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी PSI बदणे यांच्या कार, मोबाईल, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. पुढील 5 दिवसांच्या पोलिस कोठडीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






