पुणे : कोरोनाची दुसरी लाट आता कुठं ओसरतेय सर्व काही सुरळीत होतय तर तोच पुण्यातील बेलसर गावात झिका व्हायरचा पहिला रुग्ण सापडल्याने राज्याची चिंता वाढली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली असून गावातील नागरिकांच्या विविध चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकीच खबरदारीचा उपाय म्हणून या गावात कंडोम वाटले जात आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बेलसर गावात झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील अनेक आरोग्य संघटनांनी त्याठिकाणी जाऊन नागरिकांच्या विविध चाचण्या केल्या आहेत. तसेच झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.
याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्यानं पुढील 4 महिने लैंगिक संबंध टाळावेत, किंवा सुरक्षित पद्धतीनं शरीरसंबंध ठेवावेत, असंही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे राज्याची स्थिती बिकट झाली असताना, झिका विषाणूनं आणखी चिंता वाढवली आहे. बेलासर गावात सर्वत्र भीतीच वातावरण पसरलं आहे.