पोटाच्या कर्करोगाची लक्षणे
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड ऑर्गनायझेशनच्या मते, पोटाचा कर्करोग हा जगभरातील पाचव्या क्रमांकाचा कर्करोग आहे. प्रत्येक व्यक्तीला याचा धोका असला, तरी महिलांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. 60 वर्षांनंतर त्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, विशेषत: तंबाखूचे सेवन करणाऱ्या आणि या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
पोटाचा कर्करोग हा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे यात शंका नाही, पण सुरुवातीच्या टप्प्यातच आढळून आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक वेळा या आजाराची लक्षणे कॉमन मानली जातात त्यामुळे हे संकेत अनेकांना कळतच नाहीत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. येथे आम्ही तुम्हाला कर्करोगाच्या अशा काही लक्षणांबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला माहीत असणं आणि तुम्ही ते ओळखणं गरजेचे आहे. (फोटो सौजन्य – iStock)
भूक न लागणे
भूक न लागणे हे अनेकदा पोटाच्या कर्करोगाचे पहिले सामान्य लक्षण असते. कोणतीही व्यक्ती नेहमीपेक्षा कमी अन्न खाऊ लागते, त्याचा परिणाम त्याच्या वजनावरही दिसून येतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सतत भूक लागत नसेल किंवा थोडेसे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
पोटदुखी
पोटदुखी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर हे दुखणे कायम राहिल्यास किंवा वाढले तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. ही वेदना सहसा पोटाच्या वरच्या भागात किंवा स्तनाच्या हाडात होते. त्यामुळे तुम्हाला पोटात असे दुखणे जाणवत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांना भेट द्या कारण हे दुखणे कर्करोगाचेही असू शकते.
थकवा आणि अशक्तपणा
विशेषत: कोणत्याही कारणाशिवाय शरीरामध्ये अत्यंत थकवा वाटणे आणि अशक्तपणा जाणवणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. जेव्हा कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढू लागतात तेव्हा अशक्तपणा दिसू लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला दिवसेंदिवस थकवा जाणवू शकतो आणि कोणतंही काम करताना तुम्ही पटकन थकू शकता.
अचानक वजन कमी होणे
जर तुमचे वजन कोणत्याही कारणाशिवाय झपाट्याने कमी होत असेल तर ते कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक असू शकते. पोटाचा कर्करोग झाल्यास किंवा पोटात ट्यूमर झाल्यास अन्नाचे पचन नीट होत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत आणि वजन कमी होऊ लागते.
पचनसंबंधित समस्या
पोटाच्या कर्करोगामुळे सतत गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला या समस्या सतत भेडसावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे सूचित करू शकते की पोटात काहीतरी गंभीर होत आहे. तुम्ही याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.