पुरुषांचे वय जसजसे वाढत जाते, विशेषत: एकदा ते 50 किंवा त्याहून जास्त वयाचे झाले की, संभाव्य समस्या लवकर शोधून काढण्यासाठी आणि एकूणच आरोग्याच्या काळजीसाठी नियमित आरोग्य तपासणी करणे अधिक महत्वाचे ठरते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वडिलांनी निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी करून घेणे आवश्यक आहे.
अशा सहा चाचण्यांची माहिती इथे दिलेली आहे. डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी आपल्याला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आपल्या वडिलांसाठी तुम्हीही या फादर्स डे ला नक्की आरोग्याची काळजी घेण्याचा ‘पण’ करा आणि या सहा चाचण्या नक्की करून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
प्रोस्टेट – स्पेसिफीक अँटीजेन (पीएसए) चाचणी
प्रोस्टेट कॅन्सर हा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी चिंतेचा विषय आहे. पीएसए चाचणी मध्ये रक्तातील प्रोस्टेट – स्पेसिफीक अँटीजेनची पातळी मोजली जाते, अॅंटीजेन पातळी जास्त म्हणजे कर्करोग किंवा इतर प्रोस्टेट – संबंधित विकार असण्याची शक्यता. नियमित पीएसए चाचणी केल्याने लवकर निदान होऊन अधिक प्रभावी उपचार पर्याय विचारात घेता येतात आणि वेळीच उपाययोजना करणे शक्य होते.
कोलोन कॅन्सर स्क्रिनिंग
वयानुसार कोलोन कर्करोगाचा धोका वाढतो आणि नियमित तपासणी आवश्यक बनते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी दर दहा वर्षांनी कोलोनोस्कोप करणे आवश्यक आहे, जर त्यांच्या कुटुंबात आधी कुणाला असा त्रास झाला असेल तर चाचणी अधिक वारंवार करणे आवश्यक आहे. फेकल ऑकल्ट ब्लड टेस्ट (एफओबीटी) आणि सिग्मोइडोस्कोपीचा हे पर्यायदेखील आहेत. पॉलीप्स किंवा कर्करोगाची वाढ लवकर लक्षात आल्यास उपचारांच्या यशाचे प्रमाण वाढू शकते.
हृदय – रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याची तपासणी
पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि वयानुसार धोका वाढतो. आवश्यक चाचण्यांमध्ये रक्तदाब पाहणे, लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स), आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) यांचा समावेश आहे. या चाचण्यामध्ये उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि एरिथिमिया यासारखे आजार आहेत का हे समजते या आजारांवर लवकर उपचार झाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर गंभीर परिणाम टाळता येतात.
मधुमेह तपासणी
प्रौढांमध्ये टाइप 2 मधुमेह असणे अगदी सामान्य झाले आहे. उपाशी पोटी केलेली ब्लड शुगर टेस्ट किंवा HbA1c केल्याने प्रीडायबेटिक किंवा डायबेटिक असल्याचे समजते. वेळेवर निदान होणे महत्त्वपूर्ण आहे कारण त्यामुळे जीवनशैलीतील बदल आणि उपचार करून रक्तातील साखरेची पातळी कमी करणे शक्य होते आणि मज्जातंतूंचे नुकसान, मूत्रपिंड रोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या यासारखी गुंतागुंत टाळणे शक्य होते.
बोन डेन्सीटी टेस्ट
ऑस्टियोपोरोसिसचा धोका स्त्रियांशी संबंधित असतो, परंतु 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनाही हा धोका असतो, विशेषतः कुटुंबात आधी कुणाला असा त्रास झाला असेल किंवा विशिष्ट जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये हा त्रास होण्याची शक्यता असते. बोन डेन्सीटी टेस्ट किंवा डीएक्सए स्कॅन, हाडांतील खनिजांच्या घनतेचे प्रमाण पाहिले जाते ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनियाचे निदान करण्यास मदत मिळते. लवकर निदान झाल्यास हाडे मजबूत करण्यासाठी आणि फ्रॅक्चर टाळण्यासाठी आहारातील बदल, व्यायाम आणि औषधे यासारखे उपाय करणे शक्य होते.
हेदेखील वाचा – Father’s Day 2024: पिता-पुत्राचे नाते घट्ट करतील ‘हे’ उपाय, कधीही दुरावा वाढणार नाही
डोळ्यांची तपासणी
दृष्टी समस्या वयानुसार अधिक सामान्य होतात आणि ग्लूकोमा, मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन सारखे विकार होण्याची शक्यता वाढते. डोळ्याच्या डॉक्टरांकडून डोळ्याची संपूर्ण तपासणी केल्यास या समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. डोळ्यांची नियमित तपासणी केवळ दृष्टी टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर डोळ्यांमध्ये प्रकट होऊ शकणाऱ्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या विकारांचे निदान करण्यासाठी देखील आवश्यक आहे.
50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वडिलांसाठी, नियमित तपासणीद्वारे सक्रिय आरोग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे. पीएसए चाचणी, कोलन कर्करोग तपासणी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मूल्यांकन, मधुमेह तपासणी, बोन डेन्सीटी आणि डोळ्यांची तपासणी ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि लवकर संभाव्य समस्या लक्षात येण्यासाठी आवश्यक साधने आहेत. या चाचण्यांना प्राधान्य देऊन, पुरुष हे सुनिश्चित करू शकतात की ते निरोगी आणि सक्रिय राहतील आणि त्यांच्या कुटुंबासमवेत आयुष्याचा पूर्ण आनंद घेतील.