सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/ प्रगती करंबेळकर : दिवाळी म्हटले की नवीन कपडे, विशेषतः नवनवीन साड्यांची खरेदी हा अविभाज्य भाग आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील साड्यांच्या बाजारपेठेत या दिवसांत महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, विशेषतः मुनिया पैठणी या बनारसी साडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मुनिया पैठणी ही मूळतः बनारसी साडी असून तिच्या बॉर्डरवरील मुनिया डिझाइन म्हणजेच पोपटांच्या नक्षीकामाचे विणकाम या साडीला वेगळे वैशिष्ट्य देते. हाताने विणलेल्या या साड्यांचे गुंतागुंतीचे विणकाम आणि चमकदार जरीचे नक्षीकाम यामुळे ती अधिक श्रमकेंद्रित आणि किंमतीनेही उच्च श्रेणीतील मानली जाते. बाजारात सध्या या साड्यांच्या किंमती १,५०० ते २०,००० रुपयांपर्यंत आहेत. त्यातही सिंगल मुनिया, डबल मुनिया आणि ट्रिपल मुनिया या डिझाइन्सना अधिक मागणी आहे.
गडवाल कॉटन अन् नारायणपेठ पैठणी साडीचे विशेष आकर्षण
गडवाल कॉटन आणि नारायणपेठ पैठणी या साड्यांनाही चांगली मागणी आहे. जयलक्ष्मी क्रिएशनचे विक्रेते सांगतात, गडवाल साडी ही तेलंगणातील गडवाल भागात हाताने विणली जाते. हलकी, सोपी आणि आकर्षक काठ असलेली ही साडी दैनंदिन तसेच सणासुदीच्या प्रसंगांसाठी योग्य ठरते. दुसरीकडे नारायणपेठ साडी तिच्या खास पदरासाठी आणि चमकदार रेशमी व जरीच्या वापरासाठी ओळखली जाते. पारंपरिक डिझाइन्स, समृद्ध रंगसंगती आणि साडीची टिकाऊपणा यामुळे ती देखील स्त्रियांच्या पसंतीची आहे.
यंदाच्या दिवाळीत लोकप्रिय ठरणाऱ्या साड्या
राजेशाही कांजीवरम रेशीम साड्या त्यांच्या समृद्ध रंगसंगती, सोनसळी झरी आणि भारी पोतामुळे सणासुदीसाठी महिलांची पसंती ठरत आहेत.
झगमगती टिश्यू आणि अर्ध-टिश्यू रेशीम साड्या हलक्या, पण आकर्षक असल्याने दिवसभर परिधान करता येतात. मेसूर रेशीम साड्या त्यांच्या सुळसुळीत पोत आणि नितळ रंगांसाठी ओळखल्या जातात, तर झरीच्या नक्षीकामाने सजलेल्या डिझायनर साड्या आधुनिकतेचा स्पर्श देतात.
मऊ रेशीमच्या साड्या हलक्या आणि आरामदायी असल्यामुळे समारंभासाठी याही साड्यांना विशेष मागणी आहे.
पारंपरिक इल्कल साड्यांही यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात विणल्या जाणाऱ्या या साड्या कापूस आणि रेशीम यांच्या मिश्रणातून तयार होतात. ‘कसुती’ भरतकामातील पालखी, हत्ती, कमळ यांसारख्या नक्षीदार आकृत्या आणि पल्लूमधील मंदिराच्या बुरुजांची रचना ही तिची खास ओळख आहे. लाल व मरून सीमांसह चमकदार मोरहिरवे व डाळिंब लाल रंग तिला अधिक आकर्षक बनवतात.
मागच्या वर्षीप्रमाणेच या साड्यांचे दर कायम आहेत, शिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या ऑफरमुळे मागील पंधरा दिवसांपासून विक्रीत चांगली वाढ झाली आहे. पारंपरिक साड्यांमध्ये ग्राहकांचा रस अजूनही तितकाच आहे, मात्र महिलांना आता पारंपरिकतेसोबत हलका झगमगाटही हवा असतो, जो मुनिया पैठणीमध्ये सहज साधला जातो. – जयलक्ष्मी क्रिएशनस, विक्रेते