(फोटो सौजन्य: istock)
किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडामध्ये खडे तयार होणे, ही आजकालची एक सामान्य पण अतिशय त्रासदायक अशी समस्या आहे. ही समस्या मुख्यतः शरीरातील खनिजे व मीठ योग्य प्रमाणात न राहिल्यामुळे, तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होते. जेव्हा हे खनिज आणि सॉल्ट्स एकत्र येतात, तेव्हा त्याचे क्रिस्टल तयार होतात आणि तेच पुढे मोठे होऊन किडनी स्टोनमध्ये रुपांतरित होतात. सुरुवातीला लक्षणं सौम्य असली तरी, वेळेत लक्ष न दिल्यास ही स्थिती असह्य वेदना आणि गंभीर शस्त्रक्रियेस कारणीभूत ठरू शकते.
या आजाराची लक्षणं हळूहळू दिसू लागतात. पाठीच्या खालच्या भागात, कमरेत किंवा पोटात तीव्र वेदना जाणवू लागतात. या वेदना लघवी करताना अधिक वाढतात आणि कधीकधी पाठीपासून पुढे पोटाच्या बाजूला किंवा जांघा पर्यंतसुद्धा पसरतात. लघवीचा रंग गडद पिवळसर, भुरकट किंवा कधी कधी रक्ताळलेला दिसतो. त्यात दुर्गंध येतो आणि लघवी करताना जळजळ होते. अनेकदा पेशंटला मळमळ, उलटी, थंडी वाजणे किंवा ताप येण्याचीही तक्रार होते. बारकाईने पाहिल्यास अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो, कारण शरीरातील टॉक्सिन्स योग्यरीत्या बाहेर पडत नाहीत.
किडनी स्टोनचा प्रमुख कारणांमध्ये पाण्याचे कमी सेवन, जास्त प्रमाणात मीठ, प्रोटीन किंवा ऑक्सालेट असलेले पदार्थ खाणे, सततची लघवी रोखून ठेवणे, व्यायामाचा अभाव आणि अनुवांशिकता यांचा समावेश होतो. काही विशिष्ट पदार्थ जसे की पालक, चुकंदर, अंडी, मटण, अति प्रमाणातील दूध व डेअरी उत्पादने यामुळे स्टोनचा धोका वाढतो. तसेच साखरयुक्त कोल्ड ड्रिंक्स, सोडा, चहा, कॉफी आणि चॉकलेट यांचाही अतिरेक टाळणं महत्त्वाचं ठरतं.
किडनी स्टोन टाळण्यासाठी जीवनशैलीत काही साधे बदल करणे अत्यावश्यक आहे. दररोज कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणं, आहारात योग्य प्रमाणात फळं-भाज्यांचा समावेश करणं, जास्त मीठ आणि साखर टाळणं, तसेच नियमित व्यायाम करणं यामुळे स्टोन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. मूत्रपिंडांची नियमित तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाने या त्रासावर नियंत्रण मिळवता येऊ शकतो.
किडनी स्टोन ही वेळेत लक्षात घेतल्यास नियंत्रित होऊ शकणारी आणि टाळता येणारी स्थिती आहे. अनेक लोक ही लक्षणं दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे त्रास अधिक गंभीर होतो. त्यामुळे शरीरात वेगळं काही जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. निरोगी जीवनशैली अंगीकारून, योग्य आहार आणि भरपूर पाण्याचं सेवन करून आपण किडनी स्टोनपासून दूर राहू शकतो. शेवटी, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, याचं भान ठेवून आपल्याला सतत जागरूक राहणं गरजेचं आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.