स्तनाचा कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये नवा शोध
आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आणि आपल्या सुरक्षिततेचे आणि सुविधेचे प्रतीक मानली जाणारी खाद्यपदार्थांची पाकिटे आता आरोग्यासाठी गंभीर धोका म्हणून समोर येत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्रास सगळेजण अगदी मजेत पाकिटातील अन्नपदार्थांवर ताव मारत असतात. मात्र या पाकिटांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नक्कीच ते पटणार नाही. मात्र आता एका संधोधनात असा दावाच पुराव्यानिशी करण्यात आलाय.
एका संशोधनातून असे समोर आले आहे की प्लॅस्टिक, कागद आणि पुठ्ठा यासह अन्नपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये जवळपास 200 संभाव्य स्तनातील कार्सिनोजेन्स असतात, जे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिकाधिक बळकट करताना दिसत आहेत. ‘फ्रंटियर्स इन टॉक्सिकॉलॉजी’ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात दैनंदिन उत्पादनांमध्ये ही रसायने कमी करण्यासाठी मजबूत प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे असंही सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास?
फूड पॅकेजिंग फोरमचे व्यवस्थापकीय संचालक आणि अभ्यासाचे सह-लेखक जॅन मुनके यांनी सांगितले की, हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत असलेल्या रसायनांच्या संपर्कापासून मानवाला आता संरक्षण देण्याची वेळ आली आहे हे यातून कळतंय. त्यांच्यानुसार, तुमच्या दैनंदिन जीवनातील घातक रसायने कमी करून कर्करोग रोखण्याची शक्यता अद्याप शोधली गेली नाहीये आणि त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
हेदेखील वाचा – स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी, तज्ज्ञांचा खुलासा
ब्रेस्ट कॅन्सरचा जगात दुसरा क्रमांक
ब्रेस्ट कॅन्सरा हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2022 मध्ये जगभरात 2.3 दशलक्ष अर्थात 23 लाख महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि या कालावधीत 6,70,000 लोकांचा मृत्यू झालाय. अभ्यासासाठी, टीमने संभाव्य स्तन कार्सिनोजेनच्या अलीकडे प्रकाशित केलेल्या यादीची तुलना केली. त्यांना असे आढळून आले की, 189 संभाव्य स्तनातील कर्करोगजन्य पदार्थ अन्न संपर्क साहित्यामध्ये आढळून आले, ज्यात 143 प्लास्टिक आणि 89 कागद किंवा बोर्डमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे पुरावा
नक्की काय आहे कारण
याव्यतिरिक्त, टीमने केलेल्या 2020-2022 अभ्यासानुसार, त्यांना जगभरातून खरेदी केलेल्या अन्न संपर्क सामग्रीमधून 76 संशयित स्तन कर्करोगाच्या संपर्कात आल्याचे पुरावे आढळले, त्यापैकी 61 (80 टक्के) प्लास्टिकचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, युरोपीय संघ आणि US यासह उच्च नियमन केलेल्या प्रदेशांमधील बाजारांमधून अन्न संपर्क साहित्याची खरेदी केली गेली असल्याचे आढळले. संशोधकांनी सांगितले की, काढलेल्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, अन्न संपर्क सामग्रीमधून संशयास्पद स्तनाच्या कर्करोगाचा संपर्क सगळ्या लोकसंख्येमध्ये सामान्य आहे.
हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी
जागरूकतेची गरज
काय करावे याबाबत जागरूकता महत्त्वाची
सध्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनादेखील ब्रेस्ट कॅन्सर झाला असून सामान्य महिलांपर्यंत जागरूकता पोहचविण्याची गरज आहे. अनेक महिलांना अजूनही याबाबत माहिती नाही. त्यामुळे गावागावात याबाबत अधिकाधिक माहिती पोहचेल याबाबात सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.