(फोटो सौजन्य: Pinterest)
सामान्यतः स्वयंपाकघर हे प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग असतो. तिथे अन्न शिजवले जाते, कच्चा व पक्का आहार साठवला जातो आणि कुटुंबाच्या पोषणाचा तो मुख्य आधार असतो. पण गुजरातमधील एका गावाची परंपरा थोडी वेगळी आहे. या गावात प्रत्येक घरात स्वयंपाकघर आहे, पण त्यात कोणीही स्वयंपाक करत नाही. तरीही या गावातील लोक एक दिवसही उपाशी राहत नाहीत आणि आनंदात जीवन जगतात.
या गावाचे नाव
या अनोख्या परंपरेसाठी ओळखले जाणारे गाव म्हणजे चांदणकी. हे गाव गुजरातमध्ये वसले आहे. येथे प्रत्येक घरात वेगळा स्वयंपाक न करता सर्व गावकरी मिळून एकत्र जेवतात. गावातील तरुण मंडळींनी ही व्यवस्था खासकरून आपल्या वृद्ध पालकांसाठी केली आहे, जेणेकरून त्यांना रोजच्या स्वयंपाकाची कटकट भासू नये. या गावात वृद्धांची संख्या जास्त आहे.
सामूहिक स्वयंपाकाची सुरुवात कशी झाली?
गावाची लोकसंख्या साधारणतः 1000 आहे. अनेक तरुण रोजगार किंवा शिक्षणासाठी परदेशात आणि मोठ्या शहरांत स्थायिक झाले. त्यामुळे गावात वयोवृद्धांची संख्या वाढली. वृद्धांना रोज वेगवेगळा स्वयंपाक करावा लागू नये, म्हणून गावकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने अन्न बनवण्याची आणि एकत्र जेवण्याची परंपरा सुरू केली. ती आजही सुरू आहे.
गावातील एकतेचे दर्शन
या गावात लोक केवळ जेवणच नाही तर सुखदुःखही एकत्र वाटतात. कोणतीही अडचण आली तर आपसात चर्चा करून तिचे समाधान काढतात. त्यामुळे हे गाव आज संपूर्ण देशासाठी एकतेचे प्रतीक बनले आहे. अनेकजण खासकरून येथे येऊन या परंपरेचा अनुभव घेतात. गावातील सर्व सण-उत्सवही एकत्र साजरे होतात.
एकटेपणावर उपाय
ही प्रथा फक्त जेवणापुरती मर्यादित नाही. तिचा उद्देश वृद्ध स्त्रिया-पुरुषांवरील ओझे कमी करणे आणि एकटेपणावर मात करणे हा आहे. सामूहिक जेवणामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हशा-टवाळकीचे सूर सर्वत्र ऐकू येतात.
कुठे बनते सगळ्यांचे अन्न?
गावात खास सामुदायिक स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे. रोज तिथे डाळ, भाज्या, चपात्या यांसारखे जेवण शिजवले जाते. दररोज 60 ते 100 लोक मिळून स्वयंपाक करतात आणि मग संपूर्ण गाव जेवायला बसतो. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक येथे झालेलीच नाही, कारण गावकरी एकमताने आपले प्रश्न सोडवतात.
गुजरातमधील सर्वात वेगळे गाव कोणते आहे?
गुजरातमधील चांदणकी गावाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, या गावातील कोणत्याही घरात स्वयंपाकघर नाही. लोक सामुदायिक जेवणासाठी एकत्र येतात.
या प्रथेचा मूळ उद्देश काय?
सर्वांनी एकत्र जेवण करावं आणि एकमेकांचे सुख-दुःख वाटून घ्यावेत.