फोटो सौजन्य - Social Media
खरं पाहिलं, तर उन्हाळा आला की आपोआपच शरीर हलक्या आणि थंडावा देणाऱ्या आहाराची मागणी करू लागतो. या दिवसांमध्ये पचनसंस्था काहीशी मंदावलेली असते, त्यामुळे जड आणि अधिक तेलकट अन्न खाल्ल्यास पोट बिघडण्याचा किंवा जडपणा जाणवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे बहुतांश लोक फळांचा रस, सरबतं, कोशिंबीर, द्रवयुक्त पदार्थ आणि हलकं अन्न पसंत करतात. पण असेही अनेक जण असतात ज्यांना नॉनव्हेज खाण्याची सवय आणि आवड असते. मग प्रश्न उपस्थित होतो की उन्हाळ्यात नॉनव्हेज खायचंच असेल, तर चिकन खावे का मासे?
उन्हाळ्यात माशांचं सेवन करणं हे चिकनच्या तुलनेत अधिक योग्य ठरतं. माशांमध्ये असणारं प्रथिन हे शरीरासाठी सहज पचणारे असते. या प्रथिनांचा वापर शरीरात थकवा कमी करण्यासाठी आणि ऊर्जेच्या निर्मितीसाठी केला जातो. त्याचबरोबर, माशांमध्ये असणारे ओमेगा-3 फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे ॲसिड मेंदूला सतर्क ठेवण्यास मदत करतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करतं. एक महत्त्वाचं म्हणजे, मासे खाल्ल्यानंतर शरीरात उष्णता वाढत नाही, ज्यामुळे ते उन्हाळ्यासाठी योग्य ठरतात. माशांच्या सेवनामुळे थायरॉईड फंक्शन सुधारणं देखील शक्य होतं, जे अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकतं.
दुसऱ्या बाजूला, चिकनमध्ये भरपूर प्रथिनं असतात, जे हाडं मजबूत करण्यात, मांसपेशींची दुरुस्ती करण्यात उपयोगी पडतात. चिकनमध्ये हेल्दी फॅटही असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. पण चिकन ही उष्ण तासीराची वस्तू असल्यामुळे त्याचं जास्त प्रमाणात सेवन उन्हाळ्यात त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः तेलकट किंवा मसालेदार चिकन पदार्थ खाल्ल्यास पाचनावर ताण येतो आणि उष्णतेमुळे शरीरात गरमीतून येणारे त्रास अधिक होऊ शकतात.
अशा परिस्थितीत उन्हाळ्यात नॉनव्हेज खायचंच असेल, तर माशांचा पर्याय अधिक चांगला आहे. मासे सहज पचतात, शरीराला थंडावा देतात आणि अनेक पोषणमूल्यांनी युक्त असतात. फक्त ते बनवताना कमी तेल, मसाल्यांचा वापर करावा आणि पाणी भरपूर प्यावं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिकनपेक्षा मासे खाणं हे आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरतं.






