फोटो सौजन्य - Social Media
पावसाळा हा ऋतू हवामानाने आनंददायक असतो, मात्र याच काळात विविध प्रकारचे संसर्ग, पचनाचे विकार आणि प्रतिकारशक्तीतील घट यांचा धोका वाढतो. हवेत जास्त आर्द्रता असल्याने शरीराचा चयापचय मंदावतो आणि पचनक्रियाही कमकुवत होते. त्यामुळे या हंगामात आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक असते, विशेषतः फळांच्या निवडीबाबत. काही फळे आहेत, ज्यांचे सेवन करून निरोगी राहता येईल.
प्रत्येक फळ पोषणमूल्यांनी भरलेले असले तरी पावसाळ्यात काही फळे शरीराला अधिक फायदे देतात, तर काही फळे चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतात. या काळात हलकी, लवकर पचणारी आणि अँटीऑक्सिडंट्स व रोगप्रतिकारक गुणधर्म असलेली फळे खाणे सर्वोत्तम मानले जाते.
उदाहरणार्थ, सफरचंद हे फायबरयुक्त फळ पचनासाठी लाभदायक ठरते. यामध्ये असलेले पेक्टिन हे फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीराला स्वच्छ ठेवते. सकाळी किंवा संध्याकाळी, सालीसह खाल्ल्यास याचे अधिक फायदे होतात. डाळिंब हे आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे फळ रक्तशुद्धी करणे, हिमोग्लोबिन वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरते.
पपई हे अजून एक महत्त्वाचे फळ असून, यामध्ये असलेल्या पपेन एन्झाइममुळे पचनक्रिया सुधारते. हे फळ हलके असल्याने पावसाळ्यात याचे सेवन आरोग्यास हितावह असते. लीची मध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून बचाव करतात. त्याचप्रमाणे, आलूबुखारा (plum) हे फळ इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राखते व विटामिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
फळांचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. फळे नेहमी ताजी आणि स्वच्छ धुतलेलीच खावीत. खूप थंड किंवा बासी फळे टाळावीत. जड किंवा आंबट फळे मर्यादित प्रमाणात घ्यावीत. पचनातील समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळांची निवड करावी. योग्य फळांची निवड आणि संतुलित सेवन केल्यास पावसाळ्यातही आरोग्य टिकवता येते व शरीर ताजेतवाने, सशक्त राहते.