यकृताच्या आजाराने ग्रस्त पित्याला मुलीने दिले जीवदान!
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील नवसारे कुटुंबासाठी या वर्षीची होळी खास आहे; कारण त्यांच्या कुटुंबप्रमुखाला दुसरे आयुष्य मिळाल्याने त्यांच्या निरोगी भविष्याची आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यात उपनिरीक्षक असणारे सुरेश नवसारे (43) हे दीर्घकाळापासून यकृताच्या समस्येने ग्रस्त होते. त्यांना 5 मार्च 2025 रोजी दिलासा मिळाला. त्यांची मुलगी मयुरी (18) हिने तिच्या यकृताचा एक भाग दान केल्याने सुरेश यांची प्रकृती सुधारली. काही दिवसांपूर्वीच उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेल्या मयुरीने तिच्या वडिलांना त्यांच्या आवडीचा होळीचा पदार्थ पुरणपोळी खाऊ घालून शस्त्रक्रियेच्या यशाचा आनंद साजरा केला आणि नवी सुरुवात केली. कुटुंबाने हा क्षण मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयासोबत साजरा केला जिथे तिचे वडील बरे होत आहेत. सुरेश यांच्या कुटुंबाने मुंबईतील मुलुंड येथील रुग्णालयाच्या यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम राऊत यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथकाचे आभार मानले.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
सुरेश यांना पाच महिन्यांपूर्वी अॅसाइट्स (ज्यामध्ये पोटात द्रव जमा होतो आणि सूज येते) झाल्याचे निदान झाले. त्यांना ऑटोइम्यून लिव्हर फेल्युअर असल्याचे निदान झाले आणि त्यांचे यकृत वेगाने निकामी होऊ लागल्याने त्यांना यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला. ऑटोइम्यून लिव्हर फेल्युअरमध्ये शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्रिय होते आणि त्या अवयवावर हल्ला करू लागते ज्यामुळे संबंधित अवयव निकामी होतो. सुरेश त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समर्पित निरोगी जीवन जगत असल्याने या आजाराचे निदान झाल्यानंतर कुटुंबियांना आश्चर्य वाटले. सुरेश यांना तोपर्यंत केवळ मधुमेह हा एकमेव आजार होता. त्यांच्या लक्षात आलेले एकमेव लक्षण म्हणजे त्यांच्या पायांना आलेली सूज. मधुमेहामुळे ही सूज येत असल्याचे त्यांना वाटले. डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचा आग्रह कुटुंबियांनी करूनही सुरेशने यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तीन जणांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यात जास्त वेळ घालवणे किंवा प्रयत्न करणे जमत नव्हते.
सुरेश यांचे यकृत निकामी झाल्याचे निदान त्यांच्या कुटुंबाने पूर्णपणे मान्य करण्यापूर्वीच त्यांची मुलगी मयुरी हिने तिच्या मनाची तयारी केली होती. वडिलांनी कायम कुटुंबासाठी कष्ट घेतल्याने आता आपण त्यांना मदत करायची असा निर्धार या १८ वर्षांच्या मुलीने केला होता. “माझ्या वडिलांनी आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट घेतले आहेत आणि जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, त्यांना नवीन यकृताची गरज आहे तेव्हा मला काय करायचे आहे हे माहीत होते. त्यांची शस्त्रक्रिया नीट पार पडल्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज माझ्या वडिलांना ठणठणीत बरे झालेले पाहून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याची इच्छा झाली. आम्ही एकत्र होळी साजरी करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून; माझ्या मनात फक्त एकच विचार आला की ही गोड भेट आमच्यासाठी चांगल्या भविष्याची सुरुवात ठरेल. ”
या प्रत्यारोपणाबद्दल बोलताना मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाच्या यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम राऊत म्हणाले, “पूर्ण तपासणीअंती सुरेश यांच्यामध्ये ऑटोइम्यून मार्कर वाढलेले आढळले. ऑटोइम्यून स्थितीत रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता बिघडते आणि त्यांच्या स्वतःच्या यकृत पेशींवर हल्ला करते. बर्याचदा वर्षानुवर्षे या स्थितीचा अंदाज येत नाही; परंतु वेळेत निदान झाल्यास औषधोपचाराने हा आजार बरा करता येतो. सुरेश यांचा आजार आधीच गंभीर स्थितीत असल्याने त्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज होती. गेल्या 15 वर्षांत त्यांच्या यकृताच्या पेशी स्वतःच्याच अतिप्रतिकारक शक्तीमुळे नष्ट झाल्या होत्या. त्यांचा यकृताचा आजार गंभीर स्थितीत होता आणि औषधोपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. मयुरीचे यकृत निरोगी आहे आणि कोणत्याही सहव्याधी तिला नाहीत. त्यामुळे तिचे यकृत सहा महिन्यांत पुन्हा तयार होईल आणि तिला तिचे पुढील आयुष्य व्यवस्थित जगण्यात कोणतीच अडचण येणार नाही. यकृत प्रत्यारोपणानंतर 10 वर्षांपर्यंत प्राप्तकर्त्यांचे आयुर्मान 65 टक्के असते. मयुरीचा धाडसी निर्णय समाजात यकृत दानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.”
प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि सुरेश बरे होत असले तरी भविष्यातील काळजी म्हणून त्याला इम्युनोसप्रेसन्ट्स घ्यावे लागतील. 12 मार्च 2025 रोजी डिस्चार्ज मिळाल्यापासून मयुरी हळूहळू बरी होत आहे आणि या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ती तिच्या मूळ स्थितीत परत येत आहे याबद्दल तिचे कुटुंबीय कृतज्ञ आणि आनंदी आहेत. ती पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्यास उत्सुक आहे जेणेकरून एक दिवस ती कोर्ट स्टेनोग्राफर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करू शकेल.यकृताच्या आजाराने ग्रस्त पित्याला मुलीने दिले जीवदान! होळीच्या मुहूर्तावर धुळे जिल्ह्यातील कुटुंबाची नवी सुरुवात