फोटो सौजन्य - Social Media
इन्स्टाग्राम आजच्या तरुणांसाठी फार महत्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियावर तरुण तासन तास घालवत आहेत. मिम्स शेअर करणे तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. अशामध्ये सध्या रील्सचा जमाना आहे. सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा परिणाम होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत, बहुतेक जण याच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत आहेत. परंतु, सोशल मीडियाचा वाढता वापर मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा वाढवत आहे.
कुटुंबातील असो किंवा आसपासच्या लोकांमध्ये एक गोष्ट सामान्य दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये मग्न आहे. तासन्तास फोन स्क्रोल करणे आणि इंस्टा रील्स पाहण्याची सवय लोकांवर इतकी हावी झाली आहे की याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. जर तुम्हीदेखील या सवयीला बळी गेले आहात. तर वेळीच सावध व्हा! अन्यथा याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ही सवय आपल्या आरोग्यावरही बेतू शकते. फोनच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये झोपेची कमतरता, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्या वाढत आहेत. काही जण तर झोपेतही रील्सचे स्वप्न पाहतात. ही सवय फक्त तरुणांपुरती मर्यादित नसून १० वर्षांपासून ५५ वर्षांच्या वयोगटातील लोकांमध्येही दिसून येत आहे, ज्यामुळे मानसिक आजार वाढत आहेत.
महत्वाची बाब म्हणजे रील पाहण्याचे काही धोकादायक परिणाम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. काही लोक सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सतत रील्स पाहतात. त्यांना त्यातून मिळणार आनंद इतका प्रभावी असतो कि इतर कामामध्ये लक्षच लागत नाही. जर एखाद्याने काही शेअर केले आणि कामात असल्यामुळे आपल्याला ते पाहता आले नाही तरी आपला आर्धा जीव तेथे लागून असतो. सतत बेचैनी जाणवते, डोकेदुखी सुरू होते आणि इतर कामात लक्ष लागत नाही. काही जण रात्री झोप येत नाही म्हणून झोपेतून उठून रील्स पाहतात आणि पुन्हा झोप येईपर्यंत बघत राहतात. मुळात, रील्स पाहणे म्हणजे स्क्रीन टाइम घालवणे आणि असे केल्याने झोप तर येणारच नसते.
सतत रील्स पाहणे आणि स्क्रीन टाइम दिल्याने डोळ्यांना फार त्रास होतो. डोळ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. झोपताना डोळ्यांमध्ये प्रकाश जाणवतो. त्या धुंदीमध्ये काही लोकं तर वेळेवर जेवणही करत नाहीत, ज्याच्या आरोग्यवर गंभीर परिणाम होत असतो. जर तुम्हाला ही वाईट सवय लागलीच असेल तर आजपासूनच याला थांबवण्याचा प्रयत्न करा. रील्स कमी पहा. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा कोणते तरी छान पुस्तक वाचा. वेळ घालवण्यासाठी पुस्तकाचा आधार घ्या किंवा कुटुंबासोबत वेळ व्यथित करा. रील पाहण्याची सवय ही एका आजाराप्रमाणेच आहे, त्यामुळे वेळेत यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.






