Pre-Eclampsia म्हणजे नक्की काय आणि कशी घ्यावी काळजी (फोटो सौजन्य - iStock)
प्री-एक्लेम्पसियाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रसूतीपूर्व काळजी घेणे आणि जीवनशैलीतील संबंधीत विकारांना तोंड देणे गरजेचे आहे, गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या सुरुवातीला प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करत नियमित तपासणी आणि प्रसूतीपूर्व काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
गर्भवती महिलांमध्ये प्री-एक्लेम्पसियाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास, आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्री-एक्लेम्पसिया हा गर्भधारणेशी संबंधित विकार आहे ज्याच उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यानंतर हा विकसित होतो. लक्षात ठेवा, वेळीच निदान, रक्तदाबाचे वेळोवेळी निरीक्षण आणि उपचाराने ही स्थिती व्यवस्थापित करता येते, ही एक अधिक गंभीर आणि जीवघेणी गुंतागुंत आहे. प्री-एक्लेम्पसिया ही केवळ गर्भधारणेची गुंतागुंत नसून ज्या महिलांना प्री-एक्लेम्पसिया झाला आहे त्यांना भविष्यात उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका अधिक असतो (फोटो सौजन्य – iStock)
नक्की काय घडते
गर्भधारणेदरम्यान प्री-एक्लेम्पसियामध्ये उच्च रक्तदाब आणि अवयवांचे नुकसान होण्याची चिन्हे, बहुतेकदा मूत्रपिंडांवर याचा परिणाम होतो. हे सहसा गर्भधारणेच्या २० आठवड्यांनंतर होते आणि ते प्री-एक्लॅम्पसियामध्ये वाढू शकते, जिथे आकडी येणे तसेच आई आणि बाळ दोघांनाही गंभीर धोका निर्माण होतो.
कशामुळे होतो त्रास
उच्च रक्तदाबामुळे लघवीमध्ये प्रथिने, तीव्र डोकेदुखी, अंधुक दृष्टी किंवा ओटीपोटात वेदना यासारखी लक्षणे दिसून येतात. पहिल्यांदाच गर्भवती असणे, जुळे किंवा तिघे बाळ असणे, जास्त वजन असणे किंवा जुनाट उच्च रक्तदाबाची समस्या, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार यासारख्या आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. प्री-एक्लेम्पसियाचा कौटुंबिक इतिहास देखील याचा धोका वाढवतो.
उपचार न केल्यास, प्री-एक्लेम्पसियामुळे अवयव निकामी होणे, अकाली प्रसूती यासारख्या अनेक गुंतागुंत होऊ शकतात. म्हणून, गर्भवती मातांनी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करणे, वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. सर्व गर्भधारणेपैकी सुमारे ५ ते ८ टक्के प्रसूतीवर याचा परिणाम होतो.
5% मृत्यूसाठी कारणीभूत
प्री-एक्लेम्पसिया (PE) हा 5% माता मृत्युदरास जबाबदार आहे. तरुण वयोगटातील उच्च रक्तदाबाच्या वाढत्या समस्यांसह, वेळीच निदान अत्यंत महत्वाचे आहे. वेळीच उपचार न केल्यास, आई आणि बाळ दोघांवरही ते परिणाम करू शकते आणि सुपरइम्पोज्ड प्रेग्नन्सी-इंड्युस्ड हायपरटेन्शन (PIH) मध्ये प्रगती करू शकते.
या जोखमींबद्दल जागरूक राहून, डॉक्टर आणि गर्भवती माता वेळीच निदान आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी प्रतिक्रिया डॉ. सुचेता पार्टे, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, लुल्लानगर यांनी व्यक्त केली.
डॉ. सुचेता पार्टे पुढे सांगतात की, गर्भधारणेच्या २० व्या आठवड्यानंतर रक्तदाब मोजणे आणि मूत्र चाचण्यांद्वारे प्रथिन पातळी तपासून प्री-एक्लॅम्पसियाचे निदान केले जाते. प्री-एक्लॅम्पसिया आई आणि बाळ दोघांनाही प्रभावित करते. जर गर्भवती मातांमध्ये रक्तदाब नियंत्रणात आणले नाही तर ते आकुंचन, दुखापत, श्वासोच्छवास आणि मूत्रपिंड, यकृताचे नुकसान करु शकते किंवा त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतो. बाळांमध्ये, यामुळे वाढ मंदावणे, गर्भाशयात मृत्यू किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि रुग्णांनी डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि ओटीपोटात उजव्या बाजूस दुखणे यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे.
तज्ज्ञांचे मत
डॉ. निशा घुमरे, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा पुणे सांगतात की, प्री-एक्लॅम्पसिया ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी गर्भधारणेदरम्यान, सहसा २० आठवड्यांनंतर होऊ शकते. यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि यकृत आणि मूत्रपिंडासारख्या गर्भवती मातेच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. वेळेवर उपचार न केल्यास, यामुळे आई आणि बाळ दोघांसाठीही गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे की अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ किंवा जीवघेण्या समस्या उद्भवतात. म्हणूनच वेळीच निदान करणे खूप गरजेचे आहे.
नियमित तपासणी गरजेची
गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी केल्याने डॉक्टरांना प्रीक्लेम्पसियाची सुरुवातीची लक्षणे आढळण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, म्हणून नियमित रक्तदाब आणि लघवीच्या चाचण्या या वेळीच निदानास मदत करतात. जर प्रीक्लेम्पसियाचे वेळेवर निदान झाले तर विश्रांती, औषधोपचार आणि देखरेख यासारख्या योग्य काळजीने ते व्यवस्थापित केले जाऊ शकते.
काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर सुरक्षिततेसाठी बाळाची वेळीच प्रसूती करण्याचा निर्णय घेऊ शकतात, परंतु चांगल्या उपचारांनी, आई आणि बाळ दोघेही बरे होऊ शकतात. गर्भवती महिलांनी हात किंवा चेहऱ्यास अचानक सूज येणे, डोकेदुखी, दृष्टीदोष किंवा जलद वजन वाढणे यासारख्या लक्षणांबद्दल जागरूक असले पाहिजे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच तपासंनी आणि योग्य काळजी घेतल्यास, आपण आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतो.
Menopause नंतर महिलांमध्ये वाढतोय Hip Fracture चा धोका, आहाराबरोबरच हवी व्यायामाची जोड
प्री-एक्लेम्पसियामध्ये, प्लेसेंटाला पुरेसे रक्त मिळत नाही. गर्भधारणेच्या पहिल्या सहामाहीत प्लेसेंटा योग्यरित्या विकसित न झाल्यामुळे असे होऊ शकते. प्लेसेंटातील समस्यांमुळे आई आणि बाळामध्ये रक्तपुरवठा विस्कळीत होतो
प्रीक्लॅम्पसियावर काही इलाज आहे का? नाही. प्रीक्लॅम्पसियावर एकमेव इलाज म्हणजे डिलिव्हरी. तुमची लक्षणे कमी होतात याची खात्री करण्यासाठी तुमचा आरोग्य सेवा प्रदाता प्रसूतीनंतर काही आठवडे तुमचे निरीक्षण करू इच्छित असेल.
विश्रांती घेतल्याने रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे प्लेसेंटामध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि बाळाला फायदा होतो. डॉक्टर काही लोकांना अंथरुणावर झोपण्याचा आणि गरज असेल तेव्हाच बसण्याचा किंवा उभे राहण्याचा सल्ला देऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.