रशीद मोर्बेकर तिच्या लहान मुलीसह (फातिमा मोर्बेकर) कोकणातून मुंबईत रात्रीचे दीडच्या सुमारास परतत होता. दरम्यान, दादरच्या गडकरी चौकाच्या येथे रशीद त्याच्या मुलीला घेऊन एसटीतुन उतरतो. चार तासांचा हा प्रवास त्या दोघांना चांगलाच थकवलेला असतो. रशीद त्याच्या मुलीसोबत गप्पा गोष्टी करत घराच्या दिशेने जात असताना वाटेत त्यांच्या कानावर एक प्रश्न येतो. “भाऊ… अहो, ऐका ना! मला हा पत्ता सांगाल का?” रशीद मागे वळून पाहतो. एक महिला असते. एका हातामध्ये दुधाचं भांड घेऊन ती त्याला पत्ता विचारत असते.
तिला पाहून रशीद जरा विचारात पडतो. रात्रीचे दोन वाजत आलेत. संपूर्ण परिसर गाढ झोपी गेलाय. ही एकटी महिला इतक्या रात्रीचे कुणाला दूध विकायला चालली आहे? तरी गहिऱ्या विचारात गेलेला रशीद एक माणुसकी म्हणून तिच्या हातातून ती चिट्ठी हातात घेतो आणि पत्ता वाचू लागतो. पत्ता घाटकोपरचा असतो. घाटकोपरच्या एका स्मशानभूमीचा तो पत्ता असतो. वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळे बदलून जातात. तो लगेच वर पाहतो पण तिथे ती बाई उभी नसते. ती बाई क्षणार्धात गायब झालेली असते. आजूबाजूला, मागे-पुढे सगळीकडे तो पाहतो पण त्याला ती कुठेच सापडत नाही.
बापाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला पाहून फातिमा रशीदला विचारते. “अब्बा… काय झालं? असे का वागत आहात? मगासपासून मी पाहतेय? कुणाशी बोलत आहात?” हे ऐकून रशीद अखंड विचारात जातो. तो घाबरून फातिमाला म्हणतो, “अगं फातिमा… ती दूधवाले बाई. आता आपल्याला पत्ता विचारत होती.” फातिमा त्याला मध्येच अडवते. “कोण दुधवाली बाई? अब्बा… इथे कुणी नव्हतं. तुम्हीच एकटे बडबडत आहात.” रशीदला काहीच समजेना. तो फातिमाला घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघतो.
घराकडे जात असताना “जस्मिन पार्क” नावाची बिल्डिंग लागते. हे दोघे घाईघाईत त्या बिल्डिंगच्या खालून जात असताना रशीदची नजर बिल्डिंगखाली लागलेल्या बॅनरवर जाते. तिथे त्याच बाईचा फोटो लागलेला असतो, ज्या बाईने आताच चौकामध्ये रशीदला पत्ता विचारला असतो. नवल म्हणजे त्या फोटोखाली भावपूर्ण श्रद्धांजली असे मोठ्या अक्षरात नमूद असते. रशीद ते बॅनर पाहत तसाच जागेवर उभा राहतो. तोंडातून एक शब्द फुटेना! फातिमा त्याला विचारते, “काय झालं अब्बू? आता घाईत होता आता अचानक जागेवर का थांबलात? असे का वागत आहात? काय झालंय?” रशीद त्या बॅनरकडे हात दाखवत फातिमाला म्हणतो, “फातिमा… हीच ती बाई! मला पत्ता विचारात होती.” ते ऐकून फातिमाही घाबरून जाते. तिच्या पायाखालची जमीन सरकते.
ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून, फातिमाचा मित्र विहानची आई असते. जिचा मृत्यू पाच दिवसांगोदर घाटकोपरला एका अपघातात झाला असतो. त्या रात्रीपासून रशीद रात्रीचा प्रवास करणे टाळतो. असे म्हणतात आजही ती बाई दुधाचं भांड घेऊन दादरच्या गडकरी चौकात फिरते आणि लोकांना घाटकोपरच्या पत्ता दाखवते.
ही घटना वाचकांनी सांगितलेला अनुभव असून या घटनेवर आमचा कोणताही दावा नाही.