फोटो सौजन्य - Social Media
उन्हाळ्याचा तीव्र परिणाम सध्या जाणवू लागला आहे. तापमान दिवसेंदिवस वाढत असून सूर्य आग ओकत आहे. अशा वातावरणात शरीर तंदुरुस्त ठेवणे मोठे आव्हान ठरते. या दिवसांत पाण्याची कमतरता ही सामान्य बाब असते. शरीरातून घामाच्या स्वरूपात अधिक पाणी बाहेर पडल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’ हा एक सोपा आणि उपयुक्त उपाय ठरू शकतो.
आपले शरीर सुमारे ५० ते ७० टक्के पाण्याने बनलेले असते. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षमतेने काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी कमी झाले की पेशी दुर्बल होतात आणि थकवा जाणवतो. हायड्रेटेड राहिल्याने किडनी योग्यरीत्या काम करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत चालते.
थ्री ड्रिंक थिअरीनुसार दिवसभरात तीन प्रकारचे पेय घ्यावेत. पहिला प्रकार म्हणजे साधा पाणी. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर साधा पाणी कंटाळवाणं वाटत असेल, तर त्यात लिंबू, सौंफ, पुदिना, दालचिनी किंवा चिया सीड्स घालून चव आणि पोषण वाढवता येते. दुसरा प्रकार म्हणजे फळे आणि भाज्यांचे रस किंवा सूप. यामध्ये टरबूज, खरबूज, पपई, संत्री, टोमॅटो, काकडी, गाजर, पालक इत्यादींचा समावेश करता येतो. यामुळे शरीराला मिनरल्स आणि पाण्याचे दोन्ही प्रमाण मिळते. हे घटक तुम्ही सूप किंवा सॅलड स्वरूपातही घेऊ शकता.
तिसरा प्रकार म्हणजे तुमच्या आवडीनुसार पेय. यात चहा, कॉफी, दूध, लस्सी, ताक यांचा समावेश होतो. मात्र, चहा आणि कॉफीमधील कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने ते मर्यादित प्रमाणातच घ्यावेत. दिवसाला २-३ कपांपेक्षा अधिक टाळावेत. शरीरात पाण्याची कमतरता नाही याची काही लक्षणे म्हणजे वारंवार तहान न लागणे, लघवीचा रंग फिकट किंवा स्वच्छ असणे, थकवा किंवा चक्कर जाणवत नसणे आणि त्वचेला हलकी चमक असणे. त्यामुळे उन्हाळ्यात ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा अवलंब करून तुम्ही सहजपणे हायड्रेटेड राहू शकता आणि उष्णतेचा त्रास टाळू शकता.