जेवणासोबत फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे
फळे खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे?
चुकीच्या वेळी फळे खाल्ल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम?
आयुर्वेदात दीर्घकाळ हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी अनेक सल्ले देण्यात आले आहेत. पौष्टीक पदार्थांच्या सेवनासोबतच नियमित फळे खाल्ल्यास तुम्ही कायमच फ्रेश आणि ताजेतवटीत राहाल. निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन केले जाते. पण फळांचे सेवन योग्य वेळी न केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. फळे शरीरासाठी उत्तम मानली जातात. पण चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे आतड्या आणि पोटाचे विकार होतात. यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे? चुकीच्या वेळी फळे खाल्ल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
आयुर्वेदात सांगितल्यानुसार, जेवणानंतर किंवा जेवणासोबत फळे खाल्ल्यास ती लवकर पचन होत नाहीत. कारण मुख्य अन्नपदार्थांचे पचन होत असते. खाल्लेले अन्नपदार्थ किंवा फळे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये अन्नपदार्थांचे विषारी कण तसेच साचून राहतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढून शरीराला हानी पोहचते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होण्यास सुरुवात होते. पोटातील ॲसिडच्या निर्मितीवर परिणाम झाल्यानंतर जळजळ आणि अस्वस्थता वाढते.
कोणत्याही फळांचे सेवन सकाळी किंवा सकाळच्या नाश्त्यात करावे. सकाळच्या नाश्त्यात फळे खाल्ल्यास पोट भरलेले राहते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळांचे सेवन केल्यास ते सहज पचन होतात. पण रिकाम्या पोटी आंबट फळांचे अजिबात सेवन करू नये. आंबट फळांचे सेवन केल्यामुळे अपचन किंवाऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी तुम्ही सफरचंद, केळी किंवा पपई सारखी फळे खाऊ शकता.
आयुर्वेदामध्ये कायमच ताजी आणि चांगली फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. ताज्या फळांचे सेवन केल्यास महिनाभरात चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल. तसेच फळांचे सेवन कधीही दूध, दही किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत करू नये. कारण फळांचे आणि इतर पदार्थांचे स्वरूप वेगवेगळे असते. फळांमधील घटक शरीरात मिक्स झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यात स्ट्रॉबेरीसारख्या आंबट फळांचे सेवन अजिबात करू नये.
दिवसभरातून एकदातरी फळांचे सेवन करावे. संध्याकाळच्या वेळी कोणतीही फळे खाऊ नये. यामुळे फळे व्यवस्थित पचन होत नाहीत. फ्रिजमध्ये शिळी किंवा कापून ठेवलेली फळे अजिबात खाऊ नये. कापून ठेवलेली फळे काळी झाल्यानंतर त्यातील पोषण मूल्य कमी होऊन जातात. पण योग्य पद्धतीने फळांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.






