मायग्रेनवर तज्ज्ञांचा सल्ला (फोटो सौजन्य - iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
द हेडएक अँड मायग्रेन क्लिनिक, जसलोक आणि लिलावती हॉस्पिटल्स, मुंबईचे एमडी कन्सल्टन्ट इन-चार्ज डॉ. के. रविशंकर म्हणाले, “यात स्त्री-संप्रेरकांची निश्चित आणि लक्षणीय भूमिका असू शकते हे खरे असले तरीही या संपूर्ण कोड्याचा तो केवळ एक तुकडा आहे. वर्क-लाइफ म्हणजे आपले काम व जगणे यांच्यातील असमतोलामुळे निर्माण होणारे ताणतणाव किंवा धार्मिक उपासातापासांसारख्या रोजच्या जीवनशैलीशी निगडित नैमित्तिक घटकांमुळेही लक्षणे तीव्र होऊ शकतात. म्हणूनच मायग्रेन चाळवण्यास कारणीभूत ठरणारी कारणे ओळखणे ही या त्रासावर नियंत्रण मिळविण्याच्या आणि आपल्या उत्पादकतेमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरते.
जीवनशैली व दिनचर्येतील बदल व त्याला उपचारांच्या पर्यायांमध्ये अलीकडे लागलेल्या नवीन शोधांची दिलेली जोड यामुळे परिणामांत मोठा फरक पडू शकतो. म्हणूनच वैयक्तिकृत पद्धतीने आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून मायग्रेनची समस्या हाताळल्यास मायग्रेनचे रुग्ण आपल्या डोकेदुखीचे नियंत्रण आपल्या हातात घेऊ शकतात व आपल्या जीवनमानाचा दर्जा परत मिळवू शकतात.
हॉर्मोन्सचा संबंध समजून घेणे
हॉर्मोनल बदल हे स्त्रियांमध्ये मायग्रेन चाळवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वात लक्षणीय कारणांपैकी एक आहे. ही डोकेदुखी “मेन्स्ट्रुअल मायग्रेन” च्या रूपात सामोरी येऊ शकते, जी पाळी सुरू होण्याआधी किंवा पाळीदरम्यान इन्स्ट्रोजेनची पातळी अचानक खाली गेल्याने किंवा गरोदरपणात, रजोनिवृत्तीच्या काळात किंवा गर्भनिरोधके वापरताना हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे उद्भवते. हे मायग्रेन्स अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी झोपेचे नियमित वेळापत्रक जपणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, शरीराची आर्द्रता जपणे व ताणतणाव व्यवस्थापनाच्या तंत्रांचा सराव करणे यांसारख्या तुमच्या शरीराला स्थैर्य देणाऱ्या सवयी लावून घ्यायला हव्यात.
मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनो नक्की वाचा! या गोष्टींपासून राहा दूर
ताणतणाव हे निमित्त बनू देऊ नका
अनेक महिला बरेचदा व्यावसायिक, काळजीवाहू व्यक्ती आणि घरातल्या गोष्टी सांभाळणारी व्यक्ती अशा अनेक भूमिका एकाचवेळी सांभाळण्याची कसरत करत असतात, ज्यातून दीर्घकालीन ताणतणाव निर्माण होतो तसेच घरी आणि/किंवा कामाच्या ठिकाणी कष्ट आणि मोबदला यांत मोठा असमतोल निर्माण होतो. या रेट्यामुळे मज्जायंत्रणा अतिउत्तेजित होते, ज्याच्या परिणामी अॅड्रेनलाइन आणि कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स अधिक प्रमाणात निर्माण होतात व ते मायग्रेन होण्यास निमित्त ठरू शकतात तसेच त्यांची तीव्रताही वाढू शकते.
ध्यानधारणा, योगासने किंवा ताय ची सारख्या मनावरचा ताण सैल करणाऱ्या पद्धतींचा सराव केल्यास ताणतणाव हाताळण्यास व लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. डोकेदुखी केव्हा चाळवते, ती चाळविण्यास कोणती निमित्ते कारणीभूत ठरतात (तणावपूर्व प्रसंग, पदार्थ किंवा झोपेच्या सवयी यांसह) व कोणते उपचार किती परिणामकारक ठरतात याचा मागोवा ठेवणारी एक मायग्रेन डायरी तयार करा.
तुमच्या दिनचर्येमध्ये सातत्याला प्राधन्य द्या
झोप किंवा पाणी पिण्याच्या सवयींतील अनिमियतता किंवा जेवणाच्या वेळा टाळणे यांमुळे तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो आणि मायग्रेनचा अटॅक येण्याची शक्यता वाढते. दर दिवशी ठरल्या वेळी उठण्याचा व झोपण्याचा प्रयत्न करता, झोपण्याआधी स्क्रिन पाहणे टाळा; त्याऐवजी एखादे पुस्तक वाचण्याचा किंवा मंद संगीत ऐकण्याचा प्रयत्न करता, पाण्याची बाटली सोबत बाळगा आणि नियमितपणे पाण्याचे घोट घ्या; गरज भासल्यास स्वत:ला नियमित वेळी पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी अलार्म लावा.
कॅफिनच्या सेवनावर लक्ष ठेवा
मायग्रेनच्या बाबतीत कॅफेन ही दुधारी तलवार ठरू शकते. काही लोकांच्या बाबतीत ते वेदना दूर करण्यास मदत करते, तर इतरांसाठी ती डोकेदुखी चाळविणारे एक प्रमुख कारण असू शकते. तुमचे शरीर कॅफिनला कशीप्रकारे प्रतिसाद देते हे समजून घेणे व त्यानुसार सेवनाची मात्रा कमी करणे ही यातील कळीची गोष्ट आहे. प्रमाणापेक्षा जास्त वेळा, विशेषत: दुपारी किंवा संध्याकाळी खूपदा कॅफिन घेतले जाणार नाही असे पहा, कारण त्यामुळे तुमच्या झोपेचे वेळापत्रक बिघडू शकते. कॅफिनमुळे मायग्रेनवर परिणाम होतोय की नाही याबद्दल खात्री नसेल, तर कॅफिन घेण्याच्या वेळा आणि लक्षणे यांचा अनेक दिवस पाठपुरावा करा. पेपरमिंट किंवा शॅमोमाइलसारखे हर्बल चहाचे प्रकार उत्तम कॅफिनमुक्त पर्याय ठरू शकतात.
मायग्रेनपासून आराम मिळविण्यासाठी आहारात सुधारणा करा
मायग्रेनच्या व्यवस्थापनात अन्न प्रचंड मोठी भूमिका बजावते. प्रक्रिया केलेले मांस, मुरवलेले चीज आणि कृत्रिम स्वीटनर्स यांसारख्या पदार्थांमुळे काही महिलांची डोकेदुखी चाळवू शकते. जेवणाच्या वेळा चुकविल्याने किंवा वेळी-अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. दर ३-४ तासांनी थोड्या थोड्या प्रमाणात संतुलित आहार घ्या. ताजी फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि निव्वळ प्रथिनंयुक्त संतुलित आहार नियमितपणे घ्या. मधल्या वेळी काहीतरी तोंडात टाकावासे वाटले तर नट्स किंवा सुकामेवा जवळ ठेवा. एक फूड डायरी ठेवल्यास कोणकोणत्या पदार्थांमुळे मायग्रेन चाळवू शकतो याची नोंद ठेवण्यास मदत होऊ शकते.
हाय-रिस्क दिवसांसाठी सज्ज रहा
मायग्रेनचा हल्ला कोणतीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो याची मायग्रेनचा अनुभव असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कल्पना असते. आपली औषधे जवळ ठेवा आणि डोकेदुखी सुरू होण्याचे लक्षण दिसते असे वाटल्यावर किंवा ती सुरू झाल्या झाल्या ती घेऊन टाका जेणेकरून त्यांचा जास्तीत जास्त परिणाम होईल.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाण्याची बाटली नेहमी जवळ बाळगा. बरेचदा प्रखर उजेड आणि मोठा आवाज मायग्रेन चाळवण्यास कारणीभूत ठरतो. त्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी चांगल्या दर्जाचे गडद छटेचे सनग्लासेस व इअरप्लग्ज घ्या. वेदना होत असताना त्यांच्यापासून दिलासा मिळविण्यासाठी डोक्यावर किंवा मानेच्या मागच्या बाजूला थंड पाण्याच्या घड्या ठेवा किंवा लॅव्हेंडर वा पेपरमिंटसारख्या एसेन्शियल ऑइलचे काही थेंब कपाळावर किंवा मनगटावर लावा.
वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी
मायग्रेन्स वारंवार उद्भवत असतील, तीव्र असतील किंवा त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात अडथळा येत असेल तर डॉक्टरांचा किंवा न्युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. दृष्टीस अडथळा येणे किंवा बधीरपणासारख्या तीव्र लक्षणांसह मायग्रेनचे झटके आल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार गरजेचे ठरू शकतात. कॅल्सिटोनिन जीन-रिलेटेड पेप्टाइड (सीजीआरपी) रिसेप्टरला लक्ष्य करणारी व अडविणारी अँटेगॉनिस्ट औषधे, न्युरोमॉड्युलेशन इत्यादींसारखे मायग्रेनवर आता उपलब्ध असलेले प्रगत उपचार मायग्रेन्सच्या व्यवस्थापनासाठी आशादायी पर्याय खुले करणारे आहेत. याखेरीज तुमचे डॉक्टर एका सर्वसमावेशक ट्रीटमेंट प्लॅनचा भाग म्हणून इतर औषधे, जीवनशैलीत बदल आणण्यासाठीची धोरणे किंवा नॉन-इन्व्हेसिव्ह उपकरणांची शिफारस करू शकतात.
मायग्रेन्स ही एक सर्वत्र आढळून येणारी मात्र गुंतागुंतीची स्थिती आहे जी जगभरातील लक्षावधी स्त्रियांवर परिणाम करते, मात्र तिने तुमच्या आयुष्याचा ताबा घेण्याची गरज नाही. आपल्याबाबतीत मायग्रेन चाळविण्यास कारणीभूत ठरणारी विशिष्ट निमित्ते ओळखून, अधिक आरोग्यदायी सवयींचा अंगिकार करून आणि आवश्यक असेल तेव्हा व्यावसायिक मदत घेत तुम्ही आपल्या आयुष्याची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हातात घेऊ शकता व तुलनेने कमी अडथळ्यांनिशी जगायला सुरुवात करू शकता.






