(फोटो सौजन्य: Pinterest)
“गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. त्यांच्या सोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू देखील उपस्थित होते.
या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले
मंदिराचे धार्मिक महत्त्व
मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र मानले जाते. हे मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. याची खासियत म्हणजे येथे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, असा अद्वितीय संगम भारतात इतरत्र कुठेही दिसत नाही.
शिवाजी स्पूर्ति केंद्र भेट
मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान मोदी यांनी श्री शिवाजी स्पूर्ति केंद्राला देखील भेट दिली. हे केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. येथे ध्यानकक्ष असून त्याच्या चारही बाजूंना शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध किल्ले… प्रतापगड, रायगड, राजगड आणि शिवनेरी यांचे सुंदर नमुने आहेत. केंद्रात ध्यानस्थ स्थितीत असलेली शिवाजी महाराजांची भव्य मूर्तीही स्थापित आहे.
दर्शनासाठी वेळ
भ्रमरांबा देवी मंदिराचे दर्शन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असते. आठवड्यातील सर्व दिवस भक्तांसाठी खुले आहे. जरी वर्षभर येथे भक्तांची वर्दळ असते, तरी नवरात्र व कुंभम महोत्सवाच्या काळात येथे विशेष भक्तीमय वातावरण अनुभवता येते. त्या काळात मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघतो.
ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ यांची कथा
एकदा माता पार्वती यांनी भगवान शिवांना विचारले की, कैलास पर्वताव्यतिरिक्त त्यांचे सर्वाधिक प्रिय स्थान कोणते आहे. त्यावर भगवान शिव म्हणाले की श्रीशैलम हे त्यांचे आवडते आणि पवित्र स्थान आहे. या पवित्र ठिकाणी भगवान शिव मल्लिकार्जुनस्वरूपात आणि देवी पार्वती भ्रमरांबा स्वरूपात विराजमान आहेत.
या ठिकाणाचे पुराणातील महत्त्व
पुराणांनुसार, श्रीशैलम हे अत्यंत प्राचीन तीर्थस्थान आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे मल्लिकार्जुन स्वामी लिंग आणि १८ महाशक्तिपीठांपैकी सहावे भ्रमरांबा देवी पीठ येथे आहे. त्यामुळे हे ठिकाण विशेष पवित्र आणि अद्वितीय मानले जाते.
श्रीशैलमची विविध नावे
श्रीशैलमला अनेक नावांनी ओळखले जाते. श्रीगिरी, सिरिगिरी, श्रीपर्वत आणि श्रीनगर. कथेनुसार, सत्ययुगात भगवान नरसिंहस्वामी, त्रेतायुगात भगवान श्रीराम आणि माता सीता, द्वापरयुगात पांडव, आणि कलियुगात अनेक योगी, ऋषी-मुनी, संत आणि भक्त येथे येऊन श्री भ्रमरांबा आणि मल्लिकार्जुन स्वामींचे आशीर्वाद घेतात.
100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग
भ्रमरांबा देवी मंदिर, श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिराच्या मागील भागात स्थित आहे. श्रीशैलम नगरातून येथे पोहोचणे अतिशय सोपे आहे. पर्यटक आणि भक्त ऑटो रिक्षा किंवा भाड्याच्या टॅक्सीने सहजतेने मंदिरापर्यंत जाऊ शकतात. हे ठिकाण अध्यात्म, भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे, जेथे आल्यावर मन शांततेने भरून येते आणि श्रद्धेचा नवा अनुभव मिळतो.