फोटो सौजन्य - Social Media
आजच्या पिढीत अंगावर टॅटू काढण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. टॅटू म्हणजे स्टाईल, ट्रेंड आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा एक वेगळा मार्ग. पण हा निर्णय घेताना फक्त फॅशनच पाहून चालत नाही, त्यामागचे दुष्परिणाम आणि खबरदारी याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. टॅटू बनवताना त्वचेवर सुई टोचून त्यातून शाई त्वचेच्या आतील थरात सोडली जाते. त्यामुळे खूप लोकांना यात तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. काहींसाठी हा अनुभव सहन करण्यासारखा असतो, तर काहींसाठी तो त्रासदायक ठरतो. त्यामुळे शरीरावर कुठे टॅटू करायचा आणि कोणत्या गोष्टी पाळायच्या, हे आधी जाणून घेणं आवश्यक आहे.
टॅटू आकर्षक दिसतो, पण त्याचे काही आरोग्यविषयक धोकेही असतात. चुकीच्या पद्धतीने किंवा स्वच्छतेशिवाय टॅटू केल्यास HIV सारख्या संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यताही असते. शाईमुळे एलर्जी होणे, त्वचेवर सूज, खाज येणे, पुरळ येणे अशा तक्रारी अनेकदा दिसतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते.
काही भागांवर टॅटू काढणं टाळणे गरजेचे आहे. मुळात, टॅटूसाठी शरीरावरचे सगळे भाग योग्य नसतात. जर तुम्ही कोपरवर टॅटू काढत असाल तर मोठी चूक करताय कारण तेथील त्वचा जाड असल्यामुळे इंक टिकत नाही आणि सुई तुटण्याचा धोका असतो. काखेत किंवा बाइसेप्सचा खालील भाग त्वचा नाजूक असते आणि घाम येत असल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तळहातावरही टॅटू खराब होतो आणि वेदना होतात. तसेच गुडघ्याच्या मागे त्वचा अतिसंवेदनशील असते आणि रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्यामुळे धोका वाढतो.
नेहमी स्वच्छ, सॅनिटाइज्ड आणि एकदाच वापरायच्या सुई वापरणाऱ्या प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडेच जा. टॅटू बनवण्याच्या दिवशी दारू किंवा औषधं टाळा. पुरेसे पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा. टॅटू झाल्यावर सैल कपडे वापरा जेणेकरून त्वचेवर घास बसणार नाही. या सर्व बाबींचे पालन करणे महत्वाचे आहे.






