उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' चविष्ट कांजीचे सेवन
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. कधी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते तर कधी नियमित व्यायाम, ध्यान करून आरोग्य सुधारले जाते. मात्र वातावरणात सतत होणारे बदल आणि चुकीची जीवनशैली अनेक आजारांचे कारण बनते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन जाते. संपूर्ण शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागल्यानंतर सतत डोकं दुखणे, उलट्या,चक्कर, थकवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उन्हाळ्यात आहारामध्ये थंड पेयांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – pinterest)
वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ, दीर्घकाळ खोकला ठरू शकते दम्याचं लक्षण
रोजच्या आहारात थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. याशिवाय शरीराला पुरेसे पाणी मिळते. उन्हाळ्यामध्ये आहारात कांजीचे सेवन करावे. कांजीचे सेवन केल्यामुळे शरीर कायम निरोगी राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कोणत्या कांजी पेयांचे आहारात नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात नेहमीच काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. ९० टक्के पाणी काकडीमध्ये असल्यामुळे उन्हाळ्यात डॉक्टरसुद्धा काकडी खाण्याचा सल्ला देतात. काकडी खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय शरीरात वाढलेली जळजळ आणि पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित काकडी खावी. काकडी कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात काकडीचे गोलाकार कापून घेतलेले तुकडे घाला. नंतर त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, चिमूटभर काळीमिरी पावडर आणि जिऱ्याची पावडर मिक्स करा. त्यानंतर काचेची बरणी कॉटनच्या कपड्याने बांधून ठेवा. कडक उन्हात किंवा रात्रभर ठेवून सकाळी उठल्यानंतर कांजीचे सेवन करावे. या कांजीचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
भाताची कांजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. भाताची कांजी बनवताना सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात शिजवलेले भात घेऊन त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून भाजा. गॅस बंद करून त्यात कढीपत्ता आणि जिरं टाकून तयार केलेली फोडणी मिश्रणात टाका. अशा पद्धतीने तयार करा भाताची कांजी.
बीट कांजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बीट खाल्यामुळे शरीरातील कमी झालेले रक्ताचे प्रमाण वाढून थकवा, अशक्तपणा दूर होतो. बीट कांजी नियमित प्यायल्यास शरीरातील थकवा दूर होईल, पचनक्रिया सुधारेल इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळेल. बीट कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटचे पातळ तुकडे करून गरम केलेल्या पाण्यात टाका. त्यानंतर पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, मोहरी, हिंग आणि लाल तिखट घालून मिक्स करा. काचेच्या भांड्यात तयार केलेली कांजी झाकून ३ दिवस उन्हात तशीच ठेवा. यामुळे कांजीची चव अतिशय सुंदर लागेल.