भारतातील 'या' १० राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Unemployment In India : भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. तंत्रज्ञान, उद्योग, सेवा, शिक्षण आणि शेतीसह विविध क्षेत्रात देश झपाट्याने प्रगती करत आहे. तरीसुद्धा, या प्रगतीच्या शर्यतीत एक मोठा प्रश्न आजही डोके वर काढतोय तो म्हणजे तरुणांची बेरोजगारी. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कामगार ब्युरोच्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS) अहवालानुसार, भारतातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे.
सर्वात धक्कादायक आकडा लक्षद्वीप या छोट्याशा द्वीपसमूहात नोंदवला गेला. येथे जवळपास ३६.२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. एवढेच नव्हे, तर महिलांमध्ये हा दर तब्बल ७९.७ टक्के इतका आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक दहा मुलींमधील आठ जणींना रोजगार नाही. हा आकडा चिंतेचा आणि खळबळजनक आहे.
अहवालानुसार, देशभरातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरुणांचा बेरोजगारी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सर्वात गंभीर परिस्थिती असलेली शीर्ष १० राज्ये पुढीलप्रमाणे –
लक्षद्वीप – ३६.२% (महिला: ७९.७%, पुरुष: २६.२%)
अंदमान-निकोबार बेटे – ३३.६% (महिला: ४९.५%, पुरुष: २४%)
केरळ – २९.९% (महिला: ४७.१%, पुरुष: १९.३%)
नागालंड – २७.४%
मणिपूर – २२.९%
लडाख – २२.२%
अरुणाचल प्रदेश – २०.९%
गोवा – १९.१%
पंजाब – १८.८%
आंध्र प्रदेश – १७.५%
हे आकडे स्पष्ट दाखवतात की किनारपट्टीवरील व ईशान्येकडील राज्यांमध्ये रोजगाराचा तुटवडा अधिक आहे. पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि छोट्या उद्योगांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था तरुणांना दीर्घकालीन स्थिर नोकऱ्या देण्यात अपयशी ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव
दुसऱ्या बाजूला काही राज्यांनी बेरोजगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मध्य प्रदेश या यादीत तळाशी असून येथे बेरोजगारीचा दर केवळ २.६% आहे. त्याचबरोबर गुजरात (३.१%), झारखंड (३.६%) आणि दिल्ली (४.६%) याठिकाणीही परिस्थिती तुलनेने स्थिर आहे. काही राज्यांनी औद्योगिक गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि कृषीआधारित उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. देशभरातील महिला बेरोजगारी दर (११%) हा पुरुषांपेक्षा (९.८%) अधिक आहे. म्हणजेच महिलांना नोकरीच्या संधी अजूनही कमी प्रमाणात मिळत आहेत. तसेच शहरी भागात बेरोजगारीचा दर १४.७% इतका आहे, तर ग्रामीण भागात तो ८.५% आहे. शहरांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्या जास्त असली, तरी तिथे योग्य नोकऱ्यांची कमतरता भासते. ग्रामीण भागात शेती आणि पारंपरिक व्यवसायांमुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.
तरुण बेरोजगारांची ही वाढती संख्या केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही धोकादायक ठरू शकते. बेरोजगारीमुळे स्थलांतर, आर्थिक विषमता, मानसिक ताणतणाव आणि सामाजिक अस्थिरता वाढण्याचा धोका असतो.
तज्ञांच्या मते, यावर उपाय म्हणून –
कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे,
लघुउद्योग व स्टार्टअप्ससाठी भांडवल उपलब्ध करून देणे,
पर्यटन, आयटी, हरित ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे,
तसेच महिलांसाठी रोजगार संधी वाढवणे गरजेचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
भारत हा तरुणांचा देश आहे. लोकसंख्येच्या ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. हीच आपली खरी ताकद आहे. परंतु या तरुणांना रोजगार नसेल, तर देशाची प्रगतीही अपूर्ण राहील. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर समन्वयाची गरज आहे.