हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येणारी लक्षणे?
हार्ट ब्लॉकेज होण्याची कारणे?
हृदयाच्या रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी उपाय?
मानवी शरीरात असंख्य रक्तवाहिन्या असतात. शरीरात रक्तप्रवाह रक्तवाहिन्यांद्वारे सुरळीत चालू राहतो. रक्तवाहिन्या शरीरातील सर्वच लहान मोठ्या अवयवांपर्यंत रक्त आणि पोषक घटक पोहचवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरातील सर्वच रक्तवाहिन्या कायमच मोकळ्या राहणे आवश्यक आहे. पण काहीवेळा जास्त वेळ बसून राहिल्यामुळे किंवा अपघातात रक्तवाहिन्यांना हानी पोहचते. याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो.(फोटो सौजन्य – istock)
नसांमध्ये साचून राहिलेल्या पिवळ्या चिकट थरामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीराला हानी पोहचते. तसेच व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात.
हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवल्यानंतर छातीमध्ये वेदना जाणवू लागतात. बऱ्याचदा या वेदना अतिशय तीव्र असतात. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्यामुळे छातीच्या मध्यभागी वेदना होतात. त्यामुळे वारंवार छातीमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.
हार्ट ब्लॉजेची समस्या उद्भवल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्यामुळे श्वास घेताना अनेक अडचणी निर्माण होतात. थोडं काम केल्यानंतर लगेच शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवून श्वास घेण्यास अडथळे येतात. ही समस्या वारंवार उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते आणि थोडं चालल्यानंतर लगेच थकवा, अशक्तपणा येतो. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी.






