(फोटो सौजन्य: Pinterest)
हिंदू धर्मात भगवान शिवाला फार महत्त्व आहे. देशभरात भगवान शिवाची अनेक मंदिरे आहेत, लोक या मंदिरांना भेट देऊन शिवाची पूजा करतात आणि आपल्या मनोइच्छा पूर्ण करण्याचं साकडं घालतात. धार्मिक मान्यतेनुसार, इच्छापूर्तीसाठी १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे खूप लाभदायक मानले जाते. आता लवकरच श्रावण महिना येत आहे, हा महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो अशात या महिन्यात तुम्ही १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकता. याकाळात १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन फार शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात तुम्ही कोणत्याही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले तरी तुम्हाला लाभच लाभ मिळेल. अशातच आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला हवे ते सांगणार आहोत. इंस्टाग्रामवरील आराधनापाल अकाउंटच्या पोस्टमध्ये याविषयीची माहिती शेअर करण्यात आली आहे.
आता बसच्या ॲडव्हान्स बुकिंगवर मिळणार 15% डिस्काउंट, फक्त अशाप्रकारे करा बुकिंग
मेष
मेष राशीच्या लोकांनी रामेश्वरम् ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले पाहिजे. चार धामांपैकी एक असलेले हे तीर्थक्षेत्र भगवान श्री राम यांनी लंका जिंकण्यापूर्वी स्थापन केले होते असे मानले जाते. तामिळनाडू राज्यातील हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.
वृषभ राशीचे भविष्य
वृषभ राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला हवे. गुजरातमधील सौराष्ट्र येथे असलेले सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. असे मानले जाते की चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापापासून मुक्त होण्यासाठी येथे भगवान शिवाची तपश्चर्या केली होती. सोमनाथ येथे पूजा केल्याने क्षयरोग आणि इतर शारीरिक आजार बरे होतात अशी मान्यता आहे तर येथील सोमकुंडात आंघोळ केल्याने पापांचा नाश होतो अशी धारणा आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी, नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे गरजेचे मानले जाते. गुजरातमधील द्वारकाजवळील नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकारचे भय आणि अडथळे दूर होतात. तसेच इथे पूजा केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कर्क राशीचे चिन्ह
कर्क राशीच्या लोकांसाठी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे मंदिर मध्य प्रदेशातील ओंकार पर्वतावर वसलेले असून, नर्मदा नदीच्या काठी आहे. येथे ओंकारेश्वर मंदिरासोबतच ममलेश्वर मंदिर देखील आहे, जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
सिंह राशीचे भविष्य
सिंह राशीच्या लोकांनी बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. झारखंडमधील देवघर येथे असलेल्या या नवव्या ज्योतिर्लिंगाला चित्ताभूमी असेही म्हटले जाते. श्रावणात येथे जलाभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून आणि दुःखांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. श्रावणात इथे दरवर्षी श्रावणी मेळा देखील भरला जातो.
कन्या राशीचे सूर्य चिन्ह
कन्या राशीच्या लोकांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. असे मानले जाते की आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वतावर असलेले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग अश्वमेध यज्ञासारखे फळ देते आणि विवाहाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देते. हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जातात.
तुला राशी
तूळ राशीच्या लोकांनी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे अवश्य दर्शन घ्यावे. महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे आणि असे मानले जाते की महाकालेश्वरचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व भीती आणि मृत्यूचे भय दूर होते. या ठिकाणाला महाकालचे शहर असेही म्हटले जाते.
वृश्चिक राशीचे भविष्य
वृश्चिक राशीच्या लोकांनी श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे अवश्य दर्शन घ्यायला हवे. श्री घृष्णेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे आहे. संभाजीनगरजवळील हे मंदिर घृष्णेश्वर देवीच्या नावाशी देखील जोडलेले आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे देवस्थान मानले जाते. श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याने संतती सुख, विवाह आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांनी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे सर्वोत्तम आहे. संपूर्ण विश्वाचे स्वामी या अर्थाने या ठिकाणाला विश्वनाथ नाव देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिर हे शिवनगरी मानले जाते. असे मानले जाते की प्रलयात जेव्हा सर्व काही नष्ट होईल, तेव्हाही काशी आणि तेथील शिवलिंग जसेच्या तसे स्थिर राहील.
मकर
मकर राशीच्या लोकांनी महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकरला भेट दिली पाहिजे. असे मानले जाते की, त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर भगवान शिव यांनी येथे विश्रांती घेतली होती. हे ठिकाण पुणे जिल्यातील खेड तालुक्यात आहे. हे ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या काठावर आहे आणि भीमा नदीला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते.
जगातील एकमेव असा देश जिथे वर्षाला असतात १३ महिने, जगाच्या ७ वर्षे मागे आहे हे ठिकाण
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी केदारनाथला जाणे महत्वाचे आहे. उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ हे भगवान शिवाचे आवडते निवासस्थान मानले जाते. याला कैलासाची उपमा देखील देण्यात आली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक इथे दर्शनासाठी जात असतात.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असलेल्या तीन मुखी शिवलिंगाची पूजा केली जाते. तसेच गोदावरी नदीचा उगम देखील इथेच झाला आहे ज्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.