फोटो सौजन्य - Social Media
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे असा हृदयविकाराचा झटका, ज्यामध्ये छातीत तीव्र वेदना जाणवत नाही, पण शरीर काही सूक्ष्म संकेत देत असते. त्यामुळे अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या प्रकारच्या हार्ट अटॅकमध्ये थकवा, बेचैनी, छातीत हलका दडपण, पोट फुगल्यासारखे वाटणे, जळजळ किंवा अपचन यांसारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे लोक हे लक्षण फक्त गॅस किंवा अपचनाशी संबंधित असल्याचे मानतात. मात्र, हीच लक्षणे कधी कधी हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकतात.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. नवीन भामरी यांच्या मते, भारतात सायलेंट हार्ट अटॅकची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, विशेषतः ४५ वर्षांवरील पुरुष, महिलांमध्ये आणि उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये. ते म्हणतात की, “छातीत जरी तीव्र वेदना जाणवत नसेल, तरी शरीरात असामान्य थकवा, श्वास घेण्यास त्रास, पोटात जडपणा किंवा अचानक बेचैनी जाणवत असेल, तर त्वरित हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”
सायलेंट हार्ट अटॅकचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची वेळेवर ओळख न होणे. कारण रुग्णांना वेदना कमी जाणवतात आणि ते या स्थितीला साधे अपचन किंवा ताण समजतात. पण रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. अशा वेळी विलंब केल्यास जीवघेणा धोका संभवतो. विशेषतः वृद्ध आणि महिलांमध्ये या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला आहे की, जर वारंवार छातीत दडपण, पोटात फुगणे, अपचन किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ते केवळ गॅस नसून शरीराकडून दिलेला इशारा असू शकतो. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि ताण नियंत्रण या सवयी अंगीकारल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
थोडक्यात, सायलेंट हार्ट अटॅक हे नाव जरी शांत असले तरी त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. त्यामुळे शरीराचे संकेत वेळेवर ओळखा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या कारण प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.