सध्याचा तरुण वर्ग अनेक आजारांशी झगडतो आहे त्यातील एक म्हणजे संधिवात. 12 ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘जागतिक संधिवात दिवस’ पाळला जातो. बैठी आणि धावपळीची जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकता या सगळ्यांमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढत चालली आहे. वेळीच केललं निदान आणि जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना चांगल आयुष्य जगता येतं.
एक काळ असा होता ज्यावेळी संधिवात फक्त वृद्धांमध्ये दिसून येत होता. मात्र आताच्या काळात हा त्रास केवळ वयोवृध्दांपुरता मर्यादित नसून 20 ते 50 वयोगटातील व्यक्तींमध्येही याचं निदान होत आहे .या धापपळीच्या जीनवशैली आणि आहाराकडे होणारं दुर्लक्ष यामुळे संधिवाताच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बरेच तरुण रुग्ण सांध्यांमधील कडकपणा किंवा सूज येणे यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परंतु भविष्यात त्यांना दीर्घकालीन वेदनांचा सामना करावा लागतो. याबाबत ऑर्थोपेडिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे येथील डॉ अनुप गाडेकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.
डॉ. अनुप गाडेकर यांनी सांगितलं की, दर महिन्याला ओपीडीमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या १० पैकी ४ व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसुन राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पध्दत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात.
वेळीच लक्ष न दिल्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते. वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधं आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.
ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis) : हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये सांध्यातील कुर्च्याची (कार्टिलेज) झीज होते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जातात.
रुमेटाईड अर्थरायटीस (Rheumatoid Arthritis) (RA) : यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती सांध्यांच्या अस्तरावर हल्ला करते. यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा येतो. याची लक्षणे सहसा सकाळच्या अधिक तीव्र असतात.
सोरायटिक संधिवात (Psoriatic Arthritis) : हा सोरायसिस (Psoriasis) नावाच्या त्वचेच्या आजाराशी संबंधित आहे. यात सांध्यांव्यतिरिक्त त्वचेवरही परिणाम होतो.
गाऊट (Gout) : हा एक वेदनादायक संधिवात आहे जो रक्तातील यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने होतो. हे युरिक ऍसिड क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा झाल्यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते.
मुलांमधील संधिवात (Juvenile Idiopathic Arthritis – JIA): हा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात आहे. याची लक्षणे वयाच्या १६ वर्षांपूर्वी दिसतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात.
जीवनशैलीत योग्य बदल करत संधीवाताचे करा व्यवस्थापन
१ . नियमित व्यायाम:
चालणे, योगा, पोहणे किंवा स्ट्रेचिंग यासारखे सौम्य व्यायाम सांध्यांमधील कडकपणा कमी करतात आणि सांध्यांची हालचाल सुलभ करतात.
२ . संतुलित आहार:
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सयुक्त आहाराचे सेवन यामध्ये मासे, अक्रोड, जवसाच्या बिया यांचा समावेश करा. साखर, फास्टफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा
३ . वजन नियंत्रण राखा.
जास्त वजन हे सांध्यांवर ताण आणते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे हे संधीवात नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
४. तणावाचे व्यवस्थापन:
ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते.
५ . औषधोपचार आणि फिजिओथेरपी:
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार आणि फिजिओथेरपी केल्यास संधीवाताची तीव्रता कमी करण्यास मदत होते. असं डॉ. अनुप गाडेकर यांनी सांगितलं आहे.