World Heart Day:‘नॉर्मल' रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
World Heart Day: भारतातील बहुतेक व्यक्तींना त्यांच्या कोलेस्ट्रॉलबाबत माहित असते, पण फार कमी व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य माहित असते. हृदयाच्या आरोग्यासंदर्भात केअर घेण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही, याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करत आहेत. ३४ वर्षीय विक्रम देसाई यांना त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मिळाला, तेव्हा त्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेत होती. तंदुरुस्त आणि सक्रिय जीवनशैली असल्याने सर्व काही ठीक आहे असा त्यांचा समज झाला. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना महत्त्वाचा फरक समजला: लॅबमधील रिपोर्ट सर्वसाधारण माहिती देतात, पण कौटुंबिक इतिहास किंवा मधुमेहासारखे वैयक्तिक जोखीम घटक व्यक्तीचे खरे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएल-सी) लक्ष्य निश्चित करतात.(फोटो सौजन्य – istock)
विक्रम यांच्या केसमधून भारतातील शहरी भागांमधील वाढते वास्तव समोर येते. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७.८ टक्के मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होतात आणि देशातील ३१ टक्के व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली दिसून येते. पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींच्या तुलनेत भारतातील व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजार १० ते १५ वर्षे आधी होतो. अनेक लोकांना त्यांच्या एकूण कोलेस्ट्रॉलची आकडेवारी माहित असली, तरी स्वतःचे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य किती असायला पाहिजे हे फार कमी लोकांना माहित आहे.
उच्च एलडीएल-सीला अनेकदा “सायलेंट किलर” म्हटले जाते, कारण कोणतीही दृश्य लक्षणे न दाखवता ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (प्लाक) जमा करण्याचे काम करते. या स्थितीला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे महत्त्वाच्या अवयवांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. तरुण असणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे किंवा वजन नियंत्रणात असणे म्हणजे एलडीएल-सी अपेक्षित मर्यादेत आहे असे नाही.
एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान वयात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) वयाच्या १८व्या वर्षापासून लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला देते. वेळेत केलेल्या तपासणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वी शोधण्यात मदत होते. आरोग्यदायी दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील उच्च एलडीएल-सी असू शकते, त्यामुळे नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
मुंबईतील सैफी हॉस्पिटल येथील कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शाह म्हणाले, “लवकर निदान म्हणजे केवळ आकडेवारी तपासणे नाही. एलडीएल-सीचे लक्ष्य प्रत्येकासाठी वेगळे असते आणि सर्वांसाठी केअर घेण्याची एकच पद्धत लागू होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे वय, कौटुंबिक इतिहास आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे इतर आजार यांसारखे स्वतंत्र जोखीम घटक असतात, ज्यावरून एलडीएल-सी पातळी निश्चित होते. एलडीएल-सी पातळी मर्यादेत राखणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे, आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत माहित असणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणाच्या प्रवासात स्वतः केअर करणे गरजेचे आहे.”
आज माझी एलडीएल-सी पातळी किती आहे?
माझे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य काय असले पाहिजे?
माझ्या उद्दिष्टानुसार पातळी मर्यादेत आहे का, आणि नसल्यास, माझ्यासाठी कोणते पर्याय आहेत?
संतुलित आहार, तणाव नियंत्रण आणि नियमित व्यायाम यांसारखे जीवनशैलीतील बदल हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तरीही एलडीएल-सी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ जीवनशैलीतील हे बदल पुरेसे ठरतील असे नाही. अशा वेळी लिपिड कमी करणारे औषधोपचार आवश्यक ठरतात आणि दीर्घकाळापर्यंत या औषधोपचाराचे पालन करणे आवश्यक आहे.
Ans: LDL-C म्हणजे Low-Density Lipoprotein Cholesterol. याला सामान्यतः ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. रक्तातील LDL-C जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: नाही. LDL-C चे योग्य लक्ष्य व्यक्तीच्या एकूण हृदयविकाराच्या जोखमीवर अवलंबून बदलू शकते. त्यामुळे केवळ प्रयोगशाळेतील ‘नॉर्मल’ रेंज पाहण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो.
Ans: व्यक्तीचे वय, आधीचा हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि इतर जोखीम घटक लक्षात घेऊन डॉक्टर LDL-C ची योग्य लक्ष्यपातळी ठरवू शकतात.






