पुणे : पुणे शहरातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचा दावा महापालिका करीत असली तरी कुत्रा चावण्याच्या घटनेत घट झालेली दिसून येत नाही. गेल्या नऊ महीन्यात साेळा हजाराहून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, कुत्र्यांना रेबीजची लस देण्यासाठी माेहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल आहे.
महापालिकेने २०२८ मध्ये कुत्र्यांची गणना केली हाेती. यामध्ये शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ही ३ लाख १५ हजार इतकी आढळून आली हाेती. त्यानंतर मे २०२३ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. यामध्ये शहरात १ लाख ७९ हजार ९४० कुत्री असल्याचे आढळून आले हाेते. कुत्र्यांच्या संख्येत सुमारे ४२. ८७ टक्के घट झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्याचवेळी कुत्रा चावण्याच्या घटनांत अद्याप घट झाली नाही.
गेल्या नऊ महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या १६ हजार ३७२ घटना घडल्या आहेत. तर गेल्यावर्षी भटक्या कुत्र्यांनी १६ हजार ५६९ जणांना चावे घेतले होते. या दाेन्ही आकडेवारीचा विचार करता पहील्या नऊ महीन्यात यावर्षी गेल्यावर्षी एवढ्या घटना घडल्या असुन, यात पुढील तीन महीन्याच्या आकडेवारीची भर पडली तर वाढ हाेऊ शकते.
मुंबईप्रमाणे लसीकरणाची माेहीम –
गुरुवारी माॅनिटरींग बाेर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत भटक्या कुत्र्यांना रेबीजची लस देण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई महापालिकेने कुत्र्यांना रेबीजची लस देण्यासाठी विशेष माेहीम राबविली हाेती. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेने लसीकरणाची माेहीम हाती घ्यावी. त्यासाठी प्रति कुत्र्याप्रमाणे ३४५ रुपये इतक्या दराने निविदा काढण्यात यावी, असा निर्णय या बैठकीत झाला आहे, अशी माहीती अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.
अधिक संस्था पॅनेलवर घेण्याचा प्रयत्न –
महापािलकेच्या पॅनेलवर कुत्र्यांना रेबीज लस देणे आणि त्यांची शस्त्रक्रीया करण्यासाठी दाेनच संस्था आहे. या संस्थांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. संस्थांची संख्या वाढली तर लसीकरण आणइ शस्त्रक्रीयांचे प्रमाण वाढण्यास मदत हाेणार आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यास सहाय्य मिळू शकेल. तसेच कुत्र्यांवर उपचार करणाऱ्या संस्थांची माहीती गाेळा केली जाणार आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेता, साधारणपणे दर महीन्याला तीनशे कुत्र्यांना विविध आजार, दुखापत आदीवर उपचार करावे लागतात. या उपचाराची सुविधा मिळावी याकरीता प्रयत्न केले जातील.
तेवीस गावांतील कुत्र्यांंची हाेणार गणना –
महापािलकेच्या जुन्या हद्दीतील कुत्र्यांची गणना झाली आहे. परंतु महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ केलेल्या २३ गावांतील कुत्र्यांची गणना झाली नाही. ही गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे.