जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास शंभर टक्के घरफाळा माफ(फोटो - istock)
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास यंदाच्या वर्षासाठी घरफाळा माफ करण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनातून या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९१९ साली प्रयाग चिखली गावात पहिली शाळा सुरू केली. या शाळेला १०० वर्षांचा इतिहास आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचं संवर्धन व्हावं या उद्देशाने आणि शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावच्या ग्रामपंचायतीनं मासिक सभेत हा निर्णय घेतला आहे. सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या प्रयाग चिखली गावात ग्रामपंचायतीकडे १२३० नोंदणीकृत मिळकतधारक आहेत.
पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळं ग्रामपंचायतीला मिळणारा व्यावसायिक महसूल कमी प्रमाणात जमा होतो. मात्र, तरीही गावकऱ्यांनी एकी दाखवत जिल्हा परिषदेच्या शाळेचं पुनर्वसन, संवर्धन व्हावं आणि दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडं विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १०० टक्के घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेतला. एका आर्थिक वर्षात सुमारे ४० ते ५० लाख रुपये महसूल प्रयाग चिखली गावचा जमा होतो. यामध्ये घरफाळा, पाणीपट्टीचा समावेश आहे.
बिरदेव डोणे यांनी घेतले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश
नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव डोणे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळं दर्जेदार गुणवत्ता असलेल्या शाळा टिकाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीनं प्रयत्न केल्याचं उपसरपंच अर्जुन पाटील यांनी सांगितले.
पालकांना दिलासा मिळणार
प्रयाग चिखली ग्रामपंचायतने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळं गावातील पालकांना दिलासा मिळणार आहे. तर गावातील सोनतळी आणि प्रयाग चिखली विद्यामंदिर येथे प्रवेश घेणाऱ्या पहिलीच्या वर्गातील सुमारे ८० शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फायदा होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या शाळा संवर्धित होण्यासाठी ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आहे.