फोटो सौजन्य: iStock
ठाणे महापालिकेतील सेवा निवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच दिवंगत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिकेतून सेवा निवृ्तत, स्वेच्छा निवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार, ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे किंवा जे मयत झाले आहेत, त्यांच्या वारसांना महापालिकेच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीची तरतूद आहे. शासनाने यासंदर्भातील निर्णय फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतला असला, तरी या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने नुकतीच उठवली, आणि सरकारला वारसा हक्काच्या आधारे नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि वित्त मंत्रालयाने जानेवारी २०२५ अखेरीस स्पष्ट आदेश काढले. या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी संबंधित मंत्रालयांशी आणि ठाणे महापालिका प्रशासनाशी नियमित समन्वय ठेवला. या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून, वारसांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबवून, आज १५ वारसांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच उर्वरित पात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील नियुक्ती दिली जाणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की उर्वरित आदेश लवकरात लवकर निर्गमित करावेत.
Pune News: “… याचा निर्णय गृह मंत्रालय करेल”; वैष्णवी मृत्यू प्रकरणावर पंकजा मुंडेंचे महत्वाचे विधान
या ऐतिहासिक निर्णयामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त होणार आहे, तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता मिळाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. नियुक्ती प्राप्त कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आयुक्त सौरभ राव आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.